No edit permissions for मराठी

TEXT 65

man-manā bhava mad-bhakto
mad-yājī māṁ namaskuru
mām evaiṣyasi satyaṁ te
pratijāne priyo ’si me

मत्-मना:-माझे चिंतन करून; भव-हो; मत्-भक्तः-माझा भक्त; मत्-याजी-माझा पूजक; माम्-मला; नमस्कुरु-नमस्कार कर; माम्-मला; एवं-निश्चितपणे; एष्यसि-तू येशील; सत्यम्-खरोखरः ते—तुला; प्रतिजाने-मी प्रतिज्ञा करतोः प्रियः-प्रिय; असि-तू आहेस; मे-मला.

सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस.

तात्पर्य: मनुष्याने श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये. त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे, जेणेकरून त्याला सदैव कृष्ण-चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की, त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. दिवसातील चोवीस तास केवळ कृष्ण-चिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसविली पाहिजे. भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की, जो कोणी अशा विशुद्ध कृष्णभावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्णलोकाची प्राप्ती करू शकेल. कृष्णलोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सान्निध्य प्राप्त होते. भगवंतांनी अर्जुनाला हे परमगुह्यज्ञान सांगितले, कारण अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेच त्यालाही पूर्णत्व प्राप्त होऊ शकते.

          हे शब्द ठामपणे दर्शवितात की, मनुष्याने द्विभुज, वेणुधारी, श्यामसुंदर आणि केसांमध्ये मयूरपिच्छ धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रांमध्ये आढळते. मनुष्याने भगवंतांच्या श्रीकृष्ण या आदिरूपावर मनाला एकाग्र करावे; भगवंतांच्या अन्य रूपावरही ध्यान भटकू देऊ नये. भगवंतांची विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि हेच ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केले आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे.

« Previous Next »