TEXT 67
idaṁ te nātapaskāya
nābhaktāya kadācana
na cāśuśrūṣave vācyaṁ
na ca māṁ yo ’bhyasūyati
इदम्-हे; ते-तू; न-कधीही नाही; अतपस्काय-जो तप करीत नाही; न-कधीही नाही; अभक्ताय-जो भक्त नाही; कदाचन-कधीही; न-कधीही नाही; च-सुद्धा; अशुश्रुषवे-जो भक्तीमध्ये संलग्न नाही; वाच्यम्-सांगावे; न-कधीही नाही; च-सुद्धा; माम्-माझा;य:-जो; अभ्यसूयति-द्वेष करतो.
जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये.
तात्पर्य: ज्या मनुष्यांनी धर्मपद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही, कधीही कृष्णभावनामय भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही, शुद्ध भक्ताची सेवा केली नाही आणि विशेषकरून जे, श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत असे मानतात किंवा श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात त्यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. तथापि, कधी कधी पाहण्यात येते की, श्रीकृष्णांचा द्वेष करीत त्यांची निराळ्या प्रकारे उपासना करणारे आसुरी प्रवृत्तीचे लोक, भौतिक लाभप्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निराळ्या पद्धतीने प्रवचन द्यायचा व्यवसाय करतात, परंतु जो कोणी श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे. वस्तुतः इंद्रियांच्या आहारी गेलेल्या लोकांना भगवद्गीतेचा उद्देश समजणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य इंद्रियाधीन नसेल व वैदिक शास्त्रांच्या सर्व नीतिनियमांचे कठोरपणे पालनही करीत असेल, परंतु तो जर भक्त नसेल तर तोही श्रीकृष्णांना जाणणे शक्य नाही. जो स्वतःला भक्त समजतो आणि कृष्णभावनामय कर्मामध्ये संलग्न झालेला नाही तो सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, मीच परमेश्वर आहे आणि माझ्या समान अथवा माझ्याहून श्रेष्ठ असे काहीच नाही. त्यांच्या या प्रतिपादनामुळे अनेक लोक त्यांचा मत्सर करतात. श्रीकृष्णांचा द्वेष करणारेही अनेक लोक आहेत. असे लोक भगवद्गीता जाणू शकत नसल्यामुळे त्यांना भगवद्गीता सांगू नये. श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. प्रमाणित शुद्ध भक्ताकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये.