TEXT 13
dehino ’smin yathā dehe
kaumāraṁ yauvanaṁ jarā
tathā dehāntara-prāptir
dhīras tatra na muhyati
देहिन:- देहधारी आत्म्याला; अस्मिन्-यात; यथा -ज्याप्रमाणे; देहे- शरीरामध्ये; कौमारम्-बालपण; यौवनम्- तारुण्य; जरा-वार्धक्य, म्हातारपण; तथा-त्याप्रमाणे; देह-अन्तर- शरीराचे स्थानांतर; प्राप्ति:-प्राप्ती; धीर:- धीर मनुष्य; तत्र-त्यामुळे; न-कधीच नाही; मुह्यति-मोहित होतो.
ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही.
तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येकक्षणी आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. अंतत: हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये अध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठीच भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हावयाला हवे होते. शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दु:ख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकांची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते.
ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती, परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला ‘धीर’ किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही.
जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता, पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात (सनातन) आणि त्यांना ‘क्षर’ म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात, पण मोक्षप्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. तो जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामुळे सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते तर चंद्र किंवा सूऱ्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे तर परमात्मा स्वत: भगवान श्रीकृष्ण आहेत. चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की, ते एकाच स्तरावर नाहीत. जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते तर त्यांच्यामधील गुरुशिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती, असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रमाणित गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की, श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत.