No edit permissions for मराठी

TEXT 14

mātrā-sparśās tu kaunteya
śītoṣṇa-sukha-duḥkha-dāḥ
āgamāpāyino ’nityās
tāṁs titikṣasva bhārata

मात्रा-स्पर्शा:-इंद्रियाविषयांची जाणीव; तु-केवळ; कौन्तेय- हे कुंतीपुत्रा; शीत- हिवाळा; उष्ण-उन्हाळा; सुख-सुख; दु:- आणि दु:ख; दा:- देणारे; आगम - येणे; अपायिन:- अदृश्य होणारी, विनाश पावणारी; अनित्या:- अनित्य; तान्-त्या सर्वांना; तितिक्षस्व- केवळ सहन करण्याचा प्रयत्न कर; भारत-हे भरतवंशजा.

हे कौंतेया! तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती हिवाळा उन्हाळा यांच्या येण्याजाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशजा! ती सुखदु:खे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होता आणि मनुष्याने ती क्षुब्ध होता सहन करण्यास शिकले पाहिजे.

तात्पर्य: योग्य कर्तव्यपालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदु:खांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ (जानेवारी-फेब्रुवारी) महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्या वेळी अतिशय थंडी असते तरीही जे धार्मिक तत्त्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागेपुढे पाहात नाहीत. त्याचप्रमाणे मे-जून महिन्यांतील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागेपुढे पाहात नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्यपालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियम विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करू शकतो.

     अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याला कौन्तेय नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाइकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्यपालनाची जबाबदारी वाढते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही.

« Previous Next »