TEXT 40
nehābhikrama-nāśo ’sti
pratyavāyo na vidyate
sv-alpam apy asya dharmasya
trāyate mahato bhayāt
न-नाही; इह-या योगामार्गामध्ये; अभिक्रम-प्रयत्न करण्यामुळे; नाश:-हानी; अस्ति-आहे; प्रत्यवाय:-क्षय किंवा र्हास; न-कधीच नाही; विद्यते - आहे; सु-अल्पम् - अत्यल्प, थोडेसे; अपि-जरी; अस्य-या; धर्मस्य-धर्ममार्गाचे; त्रायते- मुक्त किंवा उद्धार करते; महत:- फार मोठ्या; भयात्-भयापासून.
या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा र्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या, भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते.
तात्पर्य: कृष्णभावनाभावित कर्म किंवा इंद्रियतृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णांप्रीत्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते नाही तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात; परंतु कृष्णभावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्णभावनायुक्त कर्म करणाऱ्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्णभावनेमध्ये केलेले एक टक्का कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते दोन टक्क्यांहून पुढे सुरु होते. परंतु भौतिक कर्म शंभर टक्के झाल्यावाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्णभावनेने केले होते; पण भगवंतांच्या कृपेने त्याला शंभर टक्के फलप्राप्ती झाली. यासंबंधी श्रीमद्भागवतात (1.5.17) एक सुंदर श्लोक आहे.
त्यक्त्वा स्वधर्म चरणाम्बुजं हरेर्भजन्नपक्वोऽथ पतेत्ततो यदि।
यत्र क्व वाभद्रमभूदमुष्य किं को वार्थ आप्तोऽभजतां स्वधर्मत: ॥
‘‘जर एखादा आपल्या नियत कर्माचा त्याग करून कृष्णभावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे? आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा काय फायदा होणार आहे?’’ किंवा ख्रिश्च म्हणतात त्याप्रमाणे, मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली, पण शाश्वत आत्माच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ आहे?
भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो, परंतु कृष्णभावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्णभावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्णभावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्णभावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे.