TEXT 53
śruti-vipratipannā te
yadā sthāsyati niścalā
samādhāv acalā buddhis
tadā yogam avāpsyasi
श्रुति- वैदिक ज्ञानाचे; प्रितिपन्ना- सकाम कर्मांमुळे प्रभावित झाल्याविना; ते- तुझे; यदा-जेव्हा; स्थास्यति-राहतो; निश्चला- अविचलित; समाधौ- दिव्य भावनेमध्ये किंवा कृष्णभावनेमध्ये; अचला- स्थिर, दृढ; बुद्धि-बुद्धी; तदा- त्या वेळी; योगम् - आत्मसाक्षात्कार; अवाप्स्यसि- तू प्राप्त करशील.
जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही आणि जेव्हा ते आत्मा साक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल.
तात्पर्य : जो समाधिस्थ असतो त्याला कृष्णभावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रुपांचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्णभावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे जाणणे होय. कृष्णभावनाभावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवद्भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये तसेच स्वर्गलोकांची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्मे करण्यात मग्न होऊ नये. कृष्णभावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्णाभावनाभावित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरू यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे.