TEXT 62
dhyāyato viṣayān puṁsaḥ
saṅgas teṣūpajāyate
saṅgāt sañjāyate kāmaḥ
kāmāt krodho ’bhijāyate
ध्यायत:- चिंतन करीत असताना ; विषयान- इंद्रियांचे विषय; पुंस:- व्यक्तीचे; सङ्गं:- आसक्ती; तेषु - इंद्रियांच्या विषयामध्ये; उपजायते- वाढत जाते; सङ्गांत- आसक्तीपासून; सञ्जायते- उत्पन्न होतो; काम-वासना, काम; कामात्- वासनेपासून, कामापासून; क्रोध:- क्रोध; अभिजायते - प्रकट होतो.
इंद्रियविषयांचे चिंतन करीत असताना, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो.
तात्पर्य: जो मनुष्य कृष्णभावनाभावित नाही तो इंद्रियविषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियंाना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येकजण, स्वर्गलोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रियविषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तितवाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्णभावनाभावित होणे होय. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रियसुखाकरिता विचलित केले तेव्हा शिव त्यासाठी तयारही झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला; पंरतु जेव्हा हरिदास ठाकूर तरुण भगवद्भक्त होते तेव्हा त्याचप्रमोण मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची अहैतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्रीयामुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रियोपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून जो कृष्णभावनाभावित नाही तो कृत्रिम रीतीने इंद्रियदमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण विषयसुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रियतृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो.