No edit permissions for मराठी

TEXT 8

na hi prapaśyāmi mamāpanudyād
yac chokam ucchoṣaṇam indriyāṇām
avāpya bhūmāv asapatnam ṛddhaṁ
rājyaṁ surāṇām api cādhipatyam

-नाही; हि-खचितच; प्रपश्यामि - मला दिसते; मम-माझ्या; अपनुद्यात् - दूर करू शकेल; यत्-जो; शोकम्-शोक; उच्छोषणम् - कोरडे पाडणारा; इन्द्रियाणाम् - इंद्रियांना; अवाप्य-प्राप्त होऊन; भूमौ- पृथ्वीवर; असपत्नम् - प्रतिस्पर्धी नसलेले; ऋद्धम् - समृद्ध किंवा वैभवशाली; राज्यम् - राज्य; सुराणाम् - देवांचे; अपि- सुद्धा; च- आणि; आधिपत्यम् - स्वामित्व.

ज्यायोग्य माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणार्‍या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही

तात्पर्य: धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले. परंतु असे प्रतीत होते की, आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या साहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यांमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडविणे त्याला अशक्यप्राय झाले. जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत साहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की, जो पूर्णपणे कृष्णभावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की, एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी, जर तो कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे.

किबा विप्र, किबा न्यासी, शुद्र केने नय।
येइ कृष्णतत्ववेत्ता, सेई ‘गुरु’ हय॥

     ‘‘एखाद्या व्यक्तीचे विप्र (वैदिक ज्ञानातील विद्वान) असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा सन्यांसश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही. परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण-विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय.’’ (चैतन्य चरितामृत मध्ये 8.128) म्हणून कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की,

षट्कर्मनिपुणो विप्रो मन्त्रतन्त्रविशारद:।
अवैष्णवो गुरुर्न स्याद् वैष्णव: श्वपचो गुरु:॥

     ‘‘वैष्णव किंवा कृष्णभावनेच्या विज्ञानात पारंगत असल्यावाचून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरू बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्णभावनाभावित असल्यास आध्यात्मिक गुरू बनण्यास योग्य आहे.’’ (पद्मपुराण)

     जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. तरीसुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गांद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णांच त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे (कृष्णभावनाभावित व्यक्ती) किंवा कृष्णविज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत यासारख्या शास्त्रांद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते.

     आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयींमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधता याबद्दलचे दु:ख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की, पृथ्वीवरील प्रतिस्पर्धीविरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्णभावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधानप्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ  शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच  फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीताही याची पुष्टी करते की, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति- ‘जेव्हा पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीइतपत पतन होते.’ जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अध:पतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते.

     यासाठी तर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्‍चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्णभावनामृताचा मार्ग आहे.

« Previous Next »