No edit permissions for मराठी

TEXT 7

kārpaṇya-doṣopahata-svabhāvaḥ
pṛcchāmi tvāṁ dharma-sammūḍha-cetāḥ
yac chreyaḥ syān niścitaṁ brūhi tan me
śiṣyas te ’haṁ śādhi māṁ tvāṁ prapannam

कार्पण्य-दुर्बलता, दैन्य; दोष-कमकुवतपणा; उपहत-ग्रस्त झालेला; स्व-भाव-विशेषता, स्वाभाविक वृत्ती; पृच्छामि- मी विचारत आहे; त्वाम्-तुम्हाला; धर्म-धर्म; सम्मूढ-गोंधळून, मोहग्रस्त; चेता:- अंत:करणात; यत् - काय; श्रेय:-सर्वतोपरी कल्याणकारक, श्रेयस्कर; स्यात्-असेल; निश्चितम् - निश्‍चितपणे; ब्रूहि- सांगा; तत् - ते; मे- मला; शिष्य:- शिष्य; ते - तुमचा; अहम् -मी; शाधि-उपदेश करा; माम्-मला; त्वाम्-तुम्हाला; प्रपन्नम्-शरणागत.

माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मन:शांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वांत श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारीत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा.

तात्पर्य: स्वभावत:च प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणून मनुष्याला जीवनातील ध्येयप्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणार्‍या प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणार्‍या जीवनातील सर्व गुंतागुंतींपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटविल्याशिवाय पेट घेणार्‍या जंगलातील वणव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नाको असतो तरही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देता की, जीवनातील गुंतागुंती सोडविण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तिला सर्व गोष्टींचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरुंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्र्लोकाचे तात्पर्य आहे.

     कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये (3.8.10) गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. यो वा एतदक्षरं गार्ग्यि विदित्वास्मॉंल्लोकात्प्रैति कृपण:-‘‘मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवीत नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्यामांजरांप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय.’’ जीवासाठी हे मनुष्य-जीवन म्हणजे एका अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे, ज्यायोगे तो जीवनातील समस्यांचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे. उलटपक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडविण्याबद्दल बुद्धिमान असतो. य एतदक्षरं गागिर् दित्वास्मॉंल्लोकात्प्रैति स ब्राह्मण:

     देहात्मबुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादींच्या प्रति अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. ‘त्वचारोगाच्या’ आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर उदाहरणार्थ, आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यांवर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की, तो आपल्या कुटुंबीयांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो. किंवा त्याला वाटते की, आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशूंमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की, आपल्या कुटुंबीयांबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचविण्याची आपली इच्छा ही आपल्या गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की, आपल्याकडून युद्धकर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण त्यांना निश्‍चित उत्तराबद्दल विचारीत होता. तो श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरुसमोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावयाचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्येच सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की, मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही तर श्रीकृष्णांमधील ‘अजन्मातत्त्वाला’ शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांच्या आंतर व बाह्य स्वरुपांमध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होय.

« Previous Next »