TEXT 9
sañjaya uvāca
evam uktvā hṛṣīkeśaṁ
guḍākeśaḥ paran-tapaḥ
na yotsya iti govindam
uktvā tūṣṇīṁ babhūva ha
सञ्जय: उवाच-संजय म्हणाला; एवम् - याप्रमाणे; उक्त्वा- बोलून; हृषीकेशम् - इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण यांना उद्देशून; गुडाकेश:- अज्ञानाचे नियंत्रण करण्यात प्रवीण असलेला अर्जुन; परन्तप:- हे परंतप (शत्रूला त्रस्त करणारा); न योत्स्ये-मी युद्ध करणार नाही; इति- याप्रमाणे; गोविन्दम्- इंद्रियांना आनंद देणार्या श्रीकृष्णांना उद्देशून; उक्त्वा- सांगून; तूष्णीम् - स्तब्ध; बभूव - झाला; ह- खचित.
संजय म्हणाला: याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला,‘‘हे गोविंद! मी युद्ध करणार नाही’’ आणि स्तब्ध झाला.
तात्पर्य : अर्जुन युद्ध करणार नव्हता व त्याऐवजी युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार होता हे समजल्यावर धृतराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असला पाहिजे. पण शत्रूला मारण्याइतपत अर्जुन सक्षम आहे (परंतप) असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकूळ झाला होता तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की, थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्णभावनेने परिपूर्ण होऊन निश्तितपणे युद्ध करील. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजणच पडेल, कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करील.