No edit permissions for मराठी

TEXT 10

tam uvāca hṛṣīkeśaḥ
prahasann iva bhārata
senayor ubhayor madhye
viṣīdantam idaṁ vacaḥ

तम्- त्याला उद्देशून; उवाच-म्हणाले ; हृषीकेश:- इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण; प्रहसन्-स्मितहास्य करीत; इव-जणू काय; भारत- भरतवंश हे धृतराष्ट्र; सेनयो:- सैन्याच्या; उभयो:-दोन्ही बाजूंच्या; मध्ये- मध्ये; विषीदन्तम्- शोकमग्न; इदम् -पुढीलप्रमाणे; वच:- शब्द किंवा वचन.

हे भरतवंशजा! त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण, खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले.

तात्पर्य: हृषीकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसर्‍याचे शिष्यत्व पत्करले. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते. सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. तरीसुद्धा भक्तासाठी भगवंत हे मित्र, पुत्र किंवा प्रियकर यांपैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले आणि शिष्यांबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की, गुरु आणि शिष्यांमधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रकटपणे चालला होता म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे.

« Previous Next »