No edit permissions for मराठी

TEXT 1

arjuna uvāca
jyāyasī cet karmaṇas te
matā buddhir janārdana
tat kiṁ karmaṇi ghore māṁ
niyojayasi keśava

अर्जुन:उवाच- अर्जुन म्हणाला; ज्यायसी-श्रेष्ठ; चेत्-जर; कर्मण:- सकाम कर्मापेक्षा; ते- तुमच्याप्रमाणे; मता-ग्राह्य आहे किंवा मत; बुद्धि:- बुद्धी: जनार्दन-हे कृष्ण; तत्-म्हणून; किम्-का; कर्मणि-कर्मामध्ये; घोरे-घोर; माम्-मला; नियोजयसि-नियुक्त करीत आहात; केशव - हे कृष्ण.

अर्जुन म्हणाला: हे जनार्दन! हे केशव! जर तुम्हाला वाटते की, बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात?

तात्पर्य: आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दु:खाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरूषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वीच अध्यायात आत्म्याच्या स्वरुपस्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. आणि आत्म-साक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्णभावना हा आहे अशी शिफारस केली आहे. काही वेळा कृष्णभावना म्हणजे निष्क्रियता होय, असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा, एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्णभावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु कृष्णभावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल. अर्जुनालाही वाटले की, कृष्णभावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप-तप याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर, अर्जुनाला कृष्णभावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते; परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्णभावनाभावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केले आहे.

« Previous Next »