TEXT 12
iṣṭān bhogān hi vo devā
dāsyante yajña-bhāvitāḥ
tair dattān apradāyaibhyo
yo bhuṅkte stena eva saḥ
इष्टान्-इच्छिलेले किंवा इष्ट; भोगान्- जीवनावश्यक गरजा; हि-निश्चितच; व:-तुम्हाला; देवा:-देवदेवता; दास्यन्ते-देतील; यज्ञ-भाविता:- यज्ञाने संतुष्ट झालेले; तै:- त्यांनी; दत्तान्-दिलेल्या वस्तू; अप्रदाय-अर्पण न करता; एभ्य:- या देवदेवतांना; य:- जो; भुङ्क्ते- भोग घेतो; स्तेन:-चोर; एव-निश्चितच; स:- तो.
विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील, पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे.
तात्पर्य: भगवान श्रीविष्णू यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवतांना अधिकृत करण्यात आले आहे. म्हणून शास्त्रप्रमाणित यज्ञांद्वारा त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदांमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध यज्ञ सांगण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले असतात. जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवदेवतांप्रीत्यर्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मनुष्यांच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदांमध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजनही याच तत्त्वावर म्हणजेच विविध गुणांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ, मांसाहारी लोकांना कालीदेवीचे पूजन करण्यास सांगितले आहे. ही कालीदेवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रुप आहे आणि कालीदेवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली आहे, परंतुजे सत्वगुणी आहेत त्यांच्यासाठी श्रीविष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली आहे. तथापि, सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमश: उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यांसाठी निदान पाच यज्ञ, ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते ते आवश्यक आहेत.
तरीसुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की, मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा, भगवंतांचे प्रतिनिधी असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ, जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांसभक्षकांसाठी मांस असते. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच, उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानवसमाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंतांशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असूच शकत नाहीत आणि या गोष्टीवाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की, आपले जीवन भगवंताशिवाय होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मँगनीज इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत. या गोष्टींचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींद्वारा या सर्व गोष्टी पुरविल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणती, भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनच्या अंतिम ध्येयामध्ये होते. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्यजीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रियतृप्तीकरिता भगवंतांच्या प्रतिनिधींकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टिनिर्मितीचा हा हेतूच नाही. म्हणून भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रूतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही, कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष्य फक्त इंद्रियतृप्तीच असते, तसेच यज्ञ कसे करावे याचेही त्यांना ज्ञान नसते. याकरिताच श्री चैतन्य महाप्रभूंनी अत्यंत सहजसुलभ संकीर्तन यज्ञाचा प्रारंभ केला. या जगातील जो कोणी कृष्णभावनेच्या तत्त्वांचा स्वीकार करतो, तो हा संकीर्तन यज्ञ करू शकतो.