TEXT 35
śreyān sva-dharmo viguṇaḥ
para-dharmāt sv-anuṣṭhitāt
sva-dharme nidhanaṁ śreyaḥ
para-dharmo bhayāvahaḥ
श्रेयान्- अधिक श्रेयस्कर; स्व-धर्म:- स्वत:चे नियत कर्म किंवा स्वधर्म; विगुण:- दोषयुक्त असले तरी; पर-धर्मात्-इतरांकरिता सांगण्यात आलेल्या कर्तव्यांपेक्षा; सु-अनुष्ठितात्-पूर्ण प्रकारे किंवा उत्तम रीतीने आचरण केलेल्या;स्व-धर्मे- मनुष्यांच्या नियत कार्मामध्ये; निधनम्- निधन किंवा विनाश; श्रेय:- श्रेयस्कर; पर-धर्म-इतरांसाठी सांगण्यात आलेले कर्म; भय-आवह:-भयावह.
इतरांच्या कर्मांचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वत:च्या नियत कर्माचे, दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वत:चे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचवे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते.
तात्पर्य: म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्मांचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याचा मानसिक आणि शरीरिक स्थितीला अनुसरुन सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे होत. अध्यात्मिक कर्मे म्हणजे, श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत, परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात; पंरतु कर्म करणाऱ्यासाठी, अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो तर क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक बनण्याची मुभा आहे. यास्तव अहिंसक तत्त्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने, हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्णभावनेत स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्णभावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलत: क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले तर परशुराम हे मूळत: ब्राह्मण हाते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले; पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्णभावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे.