TEXT 36
arjuna uvāca
atha kena prayukto ’yaṁ
pāpaṁ carati pūruṣaḥ
anicchann api vārṣṇeya
balād iva niyojitaḥ
अर्जुन:उवाच- अर्जुन म्हणाला; अथ-तर मग; केन-कशाद्वारे; प्रयुक्त-प्रेरित केला जातो; अयम्- एखादा; पापम्-पापकृत्ये; चरति-करतो; पूरूष:- एक मनुष्य; अनिच्छन्-इच्छा नसताना; अपि-जरी; वार्ष्णेय-हे वृष्णिवंशजा; बलात्-बळेच; इव-जणू काय; नियोजित:- नियुक्त किंवा रत केलेला.
अर्जुन म्हणाला: हे वृष्णिवंशजा! कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच, पापकर्मे करण्यास प्रेरित होतो?
तात्पर्य: जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे मूलत: आध्यात्मिक, विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मषांपासून मुक्त असतो. म्हणून स्वभावत:च तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही, परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो नि:संकोचपणे अनेक पापमय मार्गांचे आचरण करतो. कधीकधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता. जरी काही वेळा जीवाला पाप करावयाचे नसेल तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि, पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात, त्यासंबंधी पुढील श्लोकात भगवंतांनी संगितले आहे.