No edit permissions for मराठी

TEXT 2

evaṁ paramparā-prāptam
imaṁ rājarṣayo viduḥ
sa kāleneha mahatā
yogo naṣṭaḥ paran-tapa

एवम्-याप्रमाणे; परम्परा -गुरुशिष्य परंपरेद्वारे; प्राप्तम्-प्राप्त झालेले; इमम्-हे विज्ञान; राजऋषय:- राजर्षी; विदु:-जाणून घेतले; :- ते ज्ञान; कालेन-काळाच्या ओघामध्ये; इह-या जगामध्ये; महता-महान; योग:- एखाद्याने भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयीचे विज्ञान; नष्ट:- नष्ट; परन्तप- शत्रूला ताप देणाऱ्या हे अर्जुना.

     याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले, पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रुपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते.

तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, गीता ही विशेषत: राजर्षीकरिता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. निश्‍चितच, भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही तसेच स्वत:च्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांची ते रचना करतील. जेव्हा दुष्ट, दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा तेव्हा गुरुशिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनाची गरज निर्माण झाली. पाच सहस्त्र वर्षापूर्वी, गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वत: भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की, गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे, आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत (विशेषत: इंग्रजीमध्ये), पण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरुशिष्य परंपरेला अनुसरुन नाहीत. विविध सांसरिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्ये आहेत; परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित, जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ही आसुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची आत्यंतिक गरज असल्याकारणाने या ठिकाणी ही आत्यंतिक गरज भगविण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे; पण जर तिचा तार्किक तत्त्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे.

« Previous Next »