TEXT 24
brahmārpaṇaṁ brahma havir
brahmāgnau brahmaṇā hutam
brahmaiva tena gantavyaṁ
brahma-karma-samādhinā
ब्रह्म-ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरुप; अर्पणम्-अर्पण; ब्रह्म-ब्रह्म किंवा परमतत्व; हवि:- लोणी; ब्रह्म-आध्यात्मिक; अग्नौ- हवनरुपी अग्नीमध्ये; ब्रह्मणा-आत्म्याद्वारे; हुतम्-आहुती टाकलेली; ब्रह्म-भगवद्धाम; एव-निश्चितच; तेन-त्याला; गन्तव्यम्-प्राप्त होण्याजोगे; ब्रह्म-आध्यात्मिक; कर्म-कर्मामध्ये; समाधिना-पूर्णपणे तल्लीन होऊन.
कृष्णभावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे (ब्रह्मरुप) आहे आणि हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरुपाचीच आहे.
तात्पर्य: कृष्णभावनाभावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येयप्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्णभावनाभावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्णभावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे. म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्णभावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्यच दुसऱ्या पदार्थाने, दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्ध जीव, या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्णभावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजेच सर्व कर्मे श्रीविष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्णभावनाभावित होऊन किंवा केवळ श्रीविष्णुप्रीत्यर्थ केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून नि:सृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत; पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रियतृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्णभावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्णभावनेप्रीत्यर्थ अर्पण केलेले हविर्द्रव्य, हे हविर्द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय. जेव्हा परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला ‘पदार्थ’ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्याप्रीत्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्णभावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा, हवी, हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ, सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्णभावनेची हीच पद्धती आहे.