No edit permissions for मराठी

TEXT 25

daivam evāpare yajñaṁ
yoginaḥ paryupāsate
brahmāgnāv apare yajñaṁ
yajñenaivopajuhvati

दैवम्-देवतांची पूजा करण्यामध्ये; एव-याप्रमाणे; अपरे-इतर; यज्ञम्-यज्ञ; योगिन:- योगिजन; पर्युपासते-चांगल्या रीतीने उपासना करतात; ब्रह्म-परम सत्याची; अग्नौ-अग्नीमध्ये; अपरे-इतर; यज्ञम्-यज्ञ; यज्ञेन-यज्ञाद्वारे; एव-याप्रमाणे; उपजुह्वति-अर्पण करतात.

काही योगिजन, देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काहीजण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात.

तात्पर्य: पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे, कृष्णभावनाभावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. पण इतर असे लोक आहेत, जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत, जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष तत्वाप्रीत्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरुन विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणींतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यात्कारी वर्गीकरण दर्शवितात. वस्तुत: यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णूंना संतुष्ट करणे होय. श्रीविष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात, भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान-प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्णभावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र, सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्‍वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत. जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकाडंनुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना बह्वीश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्‍वास ठेवणारे असे म्हणतात. पण जे इतर लोक परम सत्याच्या निर्विशेष ब्रह्मरुपाची उपासना करतात आणि देवदेवतांचे रूपे तात्पुरती समजतात, ते स्वत:चे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात, वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात. असे निर्विशेषवादी परम सत्याच्या दिव्य स्वरुपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरुप आहे, जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्णभावनाभावित भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वत:चे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्णप्रीत्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय; पंरतु असे केल्याने तो आपले स्वत:चे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही.

« Previous Next »