No edit permissions for मराठी

TEXT 42

tasmād ajñāna-sambhūtaṁ
hṛt-sthaṁ jñānāsinātmanaḥ
chittvainaṁ saṁśayaṁ yogam
ātiṣṭhottiṣṭha bhārata

तस्मात्-म्हणून; अज्ञान-सम्भूतम्-अज्ञानाने उत्पन्न झालेला; हृत्-स्थम्-हृदयात स्थित असलेला; ज्ञान-ज्ञानाच्या; असिना-शस्त्राद्वारे; आत्मन:-स्वत:च्या; छित्वा-कापून; एनम्-हा; संशयम्-संशय; योगम्-योगामध्ये; आतिष्ठ-स्थित हो; उत्तिष्ठ-युद्धाला सज्ज हो; भारत-हे भरतवंशजा.

म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजेत. हे भारता ! योगयुक्त होऊन ऊठ आणि युद्ध कर.

तात्पर्य: या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा ‘‘जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया’ असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञकर्मांचे दोन विभाग आहेत, एकाला द्रव्ययज्ञ आणि दुसऱ्याला आत्मयज्ञ किंवा ज्ञानयज्ञ म्हटले जाते. ज्ञानयज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय. जर द्रव्य -यज्ञ, आध्यात्मिक साक्षात्कारप्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो. परंतु जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिपूर्ण सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत आहे. जेव्हा आध्यात्मिक क्रियांबद्दल विचार करतो. तेव्हा अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात. प्रथम म्हजणे स्वत:च्या आत्म्याबद्दल जाणणे किंवा स्वत:ची वैधानिक स्थिती जाणणे आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्याबद्दलचे तथ्य जो मनुष्य, भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाचे अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक ज्ञानाच्या या दोन महत्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विनाप्रयास प्राप्त करू शकतो आणि असे ज्ञान लाभदायकच आहे, कारण असा मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वत: भगवंतांनीच आपल्या दिव्य कर्मांचे वर्णन केले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असतानाही, जो भगवंतांचे सर्वज्ञ, सच्चिदानंद स्वरुप जाणीत नाही तो निश्‍चितच महामूख आहे. कृष्णभावनेची तत्वे क्रमश: स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवदेवांप्रीत्यर्थ केलेल्या विविध प्रकारच्या यज्ञांनी, ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचर्य यज्ञ, गृहस्थजीवनातील यज्ञ, इंद्रियसंयमाचा यज्ञ, योगयज्ञ, तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, वेदाध्यन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्णभावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत, पण या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्वाची बाब आहे. जो या उद्दिष्टांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे; पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावरच संशय ठेवतो, त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरूच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत कालापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लाखो वर्षांपूर्वी जे ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञानामार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. याच सूर्यदेवापासून पृथ्वीतलावर भगवंतांचा उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वत: गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे आणि स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. कारण असे लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्रीभगवन हे निश्‍चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे.

या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ या चवथ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous