No edit permissions for मराठी

TEXT 6

ajo ’pi sann avyayātmā
bhūtānām īśvaro ’pi san
prakṛtiṁ svām adhiṣṭhāya
sambhavāmy ātma-māyayā

अज:-अजन्मा; अपि-जरी; सन्-असताना; अव्यय-अविनाशी किंवा अव्ययी; आत्मा-शरीर; भूतानाम्-सर्व जन्मलेल्या प्राणिमात्रांचा; ईश्वर:- ईश्वर; अपि-जरी; सन्-असणारा; प्रकृतिम्-दिव्य रूपामध्ये; स्वाम्-स्वत:च्या; अधिष्ठाय-याप्रमाणे स्थित होऊन; सम्भवामि- मी अवतरित होतो; आत्म-मायया-माझ्या अंतरंग शक्तीने.

मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणिमात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो.

तात्पर्य- भगवंतांनी आपल्या जन्माच्या वैशिष्ट्याबद्दल सांगितले आहे: भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेकानेक गतजन्मांतील सर्व गोष्टींची स्मृती असते तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखाद्याला जर विचारण्यात आले की, पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस तर, सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठविण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो; मनुष्याने अशा खोट्या दाव्याने फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या ‘प्रकृतीचे’ अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. ‘प्रकृती’ म्हणजेच स्वभाव व स्वरूपही होय. भगवंत सांगतात की, ते आपल्या स्वत:च्या देहात अवतीर्ण होतात,ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह बदलत राहतो त्याप्रमाणे भगवंत आपले शरीर बदलत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते; पण पुढील जन्मात त्याला निराळ्या प्रकारचा देह असतो. भौतिक जगतात जीवाचे ठराविक शरीर नसते तर जीव हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो; परंतु भगवंत असे देहांतर करत नाहीत. जेव्हा ते अवतीर्ण होतात, तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले व पूर्ण ब्रह्मांडाचे स्वीमी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीराप्रमाणे विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेतून कौमार्यवस्थेमध्ये आणि कौमार्यवस्थेमधून तारुण्यावस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसुन येते. पण आश्‍चर्य म्हणजे तारुण्यावस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होती किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर, भौतिकदृष्ट्या त्याचे बरेच वय झाले होते. तरीही ते वीस किंवा पंचविशीतल्या तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्याला श्रीकृष्णांचे वृद्धावस्थेतील चित्र कधीच आढळत नाही, कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाहीत. वास्तविकपणे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांतील अखिल सृष्टीत भगवान पुराणपुरुष आहेत. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच बदलतही नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले, तरी हे स्पष्ट आहे की, ते अजन्मा, सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर, बुद्धी कधीच बदलत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय,आपल्यासमोर होणारे गमन आणि आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला वाटते की, सूर्यास्त झाला आणि जेव्हा सूर्य आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा तो आपल्याला क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य नेहमी एकाच ठिकाणी स्थित असतो; पण आपल्या सदोष आणि अपूर्ण इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची कल्पना करतो आणि भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्याकारणाने हे सिद्ध होते की, ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे ते कधीच प्रभावित होत नाहीत. वेदही निश्‍चितपणे पुष्टी देतात की, पुरुषोत्तम श्रीभगवान हे अजन्मा आहेत तरीही ते अनेकविध रूपांमध्ये प्रकट होणसाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्‍चितपणे सांगण्यात आले आहे की, भगवंत जरी जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात बदल होत नाही. श्रीमदभागवतात, हे आपल्या मातेसमोर षडैश्वर्यपूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंतांचे मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांची जीवांवरील अहैतुकी कृपाच होय. यामुळे जीव, निर्विशेषवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपावर ध्यान न करता भगवंतांच्या मूळ रूपावर ध्यान करू शकतात. विश्व-कोष शब्दाकोषानुसार माया किंवा आत्ममायया हा शब्द भगवंतांच्या अहैतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व आविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे. पण सामान्य जीवाला जेव्हा दुसरे शरीर प्राप्त होते, तेव्हा त्याला आपल्या पूर्व शरीराबद्दलच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहेत, कारण ते जेव्हा या भूतलावर असतात तेव्हा ते आश्‍चर्यकारक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परम सत्य आहेत आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांमध्ये काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्‍न उद्भवू शकतो की, भगवंता आविर्भूत आणि तिरोभूत का होतात. याचे विवेचन पुढील श्‍लोकात करण्यात आले आहे.

« Previous Next »