No edit permissions for मराठी

TEXT 5

śrī-bhagavān uvāca
bahūni me vyatītāni
janmāni tava cārjuna
tāny ahaṁ veda sarvāṇi
na tvaṁ vettha paran-tapa

 श्री-भगवान उवाच-श्रीभगवान म्हणाले; बहूनि-अनेक; मे- माझे; व्यतीतानि-होऊन गेले आहेत; जन्मानि-जन्म; तव-तुझे; -सुद्धा; अर्जुन-हे अर्जुन; तानि-ते; अहम्-मी; वेद-जाणतो; सर्वाणि-सर्व; - नाही; त्वम्-तू; वेत्थ-जाणतोस; परन्तप-हे परंतप, शत्रूला ताप देणाऱ्या.

श्रीभगवान म्हणाले: माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप! मी ते सर्व जन्म आठवू शकतो; पण तू आठवू शकत नाहीस.

तात्पर्य: ब्रह्मसंहितेमध्ये (5.33) आपल्याला भगवंतांच्या अनंत अवतारांची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की,

अद्वैतमच्युतमनादिमनन्तरुपमाद्यं पुराणपुरुषं नवयौवनं च।
वेदेषुदुर्लभमदुर्लभमात्मभक्तौ गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि॥

     ‘‘ मी आदिपुरुष श्रीगोविंदांना (श्रीकृष्णांना) प्रणाम करतो जे अद्वैत, अच्युत आणि अनादी आहेत. जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन, आद्य पुरुष आणि नित्य नवयौवनसंपन्न आहेत. भगवंतांची अशी सच्चिदानंद रूपे श्रेष्ठ वैदिक विद्वान जाणतात; पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे नेहमी दर्शन होते.’’

ब्रह्मसंहितेमध्ये (5.39) हेही सांगण्यात आले आहे की,

रामदिमूर्तिषु कलानियमेन तिष्ठन् नानावतारमकरोद् भुवनेषु किन्तु ॥
कृष्ण: स्वयं समभवत् परम: पुमान यो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ॥

     ‘‘मी  आदिपुरुष श्रीगोविंदांना (श्रीकृष्ण) प्रणाम करतो की, जे राम, नृसिंह तसेच इतर अंशावतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वत: मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात व व्यक्तिश: स्वत: अवतार धारण करतात.’’

     वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की, भगवंत जरी एकमेवाद्वितीय असले तरी ते स्वत:ला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात. भगवंत हे वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत कारण, वैदुर्य रत्नाचा रंग बदलला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम राहते. भगवंतांची अनेकविध रुपे केवळ वेदाध्यनाने जाणता येत नाहीत तर त्यांचे विशुद्ध, अनन्य भक्तच ती रूपे जाणतात (वेदेषु दुर्लभमदुर्लभमात्मभक्तौ). अर्जुनासारखे भक्त हे भगवंतांचे नित्य पार्षद असतात आणि जेव्हा भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशा पार्षदांपैकी अर्जुन हा एक पार्षद आहे आणि या श्‍लोकावरून कळून येते की, काही लाख वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेव विवस्वानाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपामध्ये उपस्थित होता. पण भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की, भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरत नव्हती. अंशरुप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रुदमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतप म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. जो भगवंतांचा नित्य पार्षद असतो तो निश्‍चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. ब्रह्मसंहितेमध्ये भगवंतांचे ‘अच्युत’ म्हणून वर्णन करण्यात आले आहे, अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वत:चे कधीच विस्मरण होत नाही. म्हणून जीव अर्जुनाप्रमाणेच मुक्त असला तरी तो सर्व दृष्टीने भगवंतांशी कधीच समान होऊ शकत नाही. अर्जुन जरी भगवंतांचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंतांच्या स्वरुपाचे विस्मरण होते, पण भगवंतांच्या दैवी कृपेने भक्त तात्काळ त्यांच्या अच्युत स्वरुपाला जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. त्यामुळेच गीतेतील या वर्णनाचे आकलन आसुरी बुद्धीच्या लोकांना होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरुप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लाखो वर्षांपूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की, जीवाने आपले शरीर बदलल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंत आपले सच्चिदानंद शरीर बदलत नसल्यामुळे ते सर्व गोष्टी आठवू शकत होते. ते अद्वैत आहेत, अर्थात, त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वत:चे स्वरूप यांत काहीही भेद नाही. भगवंतांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे; पण बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हासुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्याकरणाने, त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून नेहमी भिन्नच असते. भगवंतांचे हे दिव्य स्वरुप असुर जाणू शकत नाहीत. या दिव्य स्वरुपाचे वर्णन स्वत: भगवंतांनी पुढील श्‍लोकामध्ये केले आहे.

« Previous Next »