No edit permissions for मराठी

TEXT 16

jñānena tu tad ajñānaṁ
yeṣāṁ nāśitam ātmanaḥ
teṣām āditya-vaj jñānaṁ
prakāśayati tat param

ज्ञानेन-ज्ञानाने; तु-परंतु; तत्-ते; अज्ञानम्-अज्ञान; येषाम्-ज्यांचे; नाशितम्-नष्ट झाले आहे; आत्मन:-जीवात्म्यांचे; तेषाम्-त्यांचे; आदित्य-वत्- उगवत्या सूर्याप्रमाणे; ज्ञानम्-ज्ञान; प्रकाशयति-प्रकाशित करते; तत् परम्-कृष्णभावना.

परंतु, जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते.

तात्पर्य: श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्‍चितच भ्रमित झालेले असतात; परंतु जे कृष्णभावनभावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की, सर्वज्ञानप्लवेन, ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि आणि न हि ज्ञानेन सदृशम्, ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? सातव्या अध्यायातील एकोणिसाव्या श्‍लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे, परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो, तेव्हा होते. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते. अनेकानेक  जन्मांनंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य, श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्णभावनेची प्राप्ती करतो. तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतेा, उदाहरणार्थ, जेव्हा  तो स्वत:ला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्‍वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान, भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्णभावनाभावित मनुष्याकडून होऊ शकते, म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्णभावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहजे, कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्णभावना निश्‍चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्णभावनाभावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध, याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वत: भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही. कारण त्याला भगवंताचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे, म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात (2.12) सांगतात की, प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते, वर्तमानकाळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्यकाळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो; परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरुप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे.

« Previous Next »