TEXT 21
bāhya-sparśeṣv asaktātmā
vindaty ātmani yat sukham
sa brahma-yoga-yuktātmā
sukham akṣayam aśnute
बाह्य-स्पर्शेषु-बाह्य इंद्रियसुखामध्ये; असक्त-आत्मा- जो आसक्त नाही; विन्दति-उपभोगती; आत्मनि-स्वत:मध्ये; यत्-जे; सुखम्-सुख; स:- तो; ब्रह्म-योग-ब्रह्मावरील ध्यानाद्वारे; युक्त-आत्मा-आत्मयुक्त; सुखम्-सुख; अक्षयम्-अमर्यादित; अश्नुते-उपभोगतो.
असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रियसुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वत:मध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो
तात्पर्य: कृष्णभावनाभावित महान भक्त श्रीयमुनाचार्य म्हणतात की:
यदवधि मम चेत: कृष्णपादारविन्दे
नवनवरसधामन्युद्यत रन्तुमासीत्।
तदवधि बत नारीसंगमे स्मर्यमाने
भवति मुखविकार: सुष्ठु निष्ठीवनं च॥
‘‘माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून, जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे सुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो.’’ ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य, भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की, त्याची भौतिक इंद्रियसुखाची रूची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिकदृष्ट्या मैथुनसुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुनसुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यावाचून मुळीच कार्य करू शकत नाही. परंतु कृष्णभावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथुनसुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुनसुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत. कृष्णभावनाभावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रियसुखाकडे आकर्षित होत नाही.