No edit permissions for मराठी

TEXT 7

yoga-yukto viśuddhātmā
vijitātmā jitendriyaḥ
sarva-bhūtātma-bhūtātmā
kurvann api na lipyate

योग-युक्त:- भक्तीमध्ये मग्न असणारा; विशुद्ध आत्मा-विशुद्ध आत्मा; विजित -आत्मा-आत्मसंयमी; जित-इन्द्रिय:- इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला; सर्व-भूत-जीवात्मा; आत्म-भूत-आत्मा- दयाळू किंवा करुणामयी; कुर्वन् अपि-जरी कर्म करीत असला तरी; -कधीच नाही; लिप्यते-बांधला जातो.

जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही.

तात्पर्य: जो कृष्णभावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणिमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणिमात्र त्याला प्रिय असतात. हे त्याच्या कृष्णभावनेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात, त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णांपासन भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते. तो योग्य रीतीने जाणतो की, वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते किंवा उदराला अन्नपुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरविली जाते. कृष्णभावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो. आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकरणाने त्याची इंद्रियेसुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णांवर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधीच शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिये भगवत्सेवेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो. श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काहीही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. म्हणून त्याची  इंद्रिये संयमित असतात. संयमित इंद्रिये असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही. एखादा विचारेल की, युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता? तो कृष्णभावनाभावित नव्हता का? अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता (दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे) कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरी सर्व उपस्थित व्यक्ती शाश्‍वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुत: मुळीच युद्ध करीत नव्हता, तर तो पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता. असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही.

« Previous Next »