TEXTS 13-14
samaṁ kāya-śiro-grīvaṁ
dhārayann acalaṁ sthiraḥ
samprekṣya nāsikāgraṁ svaṁ
diśaś cānavalokayan
praśāntātmā vigata-bhīr
brahmacāri-vrate sthitaḥ
manaḥ saṁyamya mac-citto
yukta āsīta mat-paraḥ
समम्- सरळ; काय-शरीर; शिर:- शिर; ग्रीवम्-मान; धारयन्-धरून; अचलम्-अचल; स्थिर:-स्थिर, सम्प्रेक्ष्य-दृष्टी ठेवून; नासिका-नाकाच्या; अग्रम्-अग्रावर; स्वम्-स्वत:च्या; दिश:-सभोवार; च-सुद्धा; अनवलोकयन्-न पाहता; प्रशान्त-अविचलित; आत्मा-मन; विगत-भी:- भयरहित; ब्रह्मचारि-व्रते-ब्रह्मचारी व्रत पाळून; स्थित-स्थित होऊन; मन:-मन; संयम्य-पूर्णपणे दमन करून; मत्-माझ्यावर (श्रीकृष्ण); चित्त:-मन केंद्रित करणे; युक्त:-वास्तविक योगी; आसीत-बसावे; मत्-माझ्यावर; पर:- अंतिम ध्येय
मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलीत आणि संयमित मनाने भयरहित होऊन, कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे.
तात्पर्य: श्रीकृष्णांना जाणणे हे जीवनाचे ध्यय आहे. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णुरुप परमात्मा रूपामध्ये स्थित असतात. योगाभ्यास हा या अंतर्यामी विष्णुरुपाचा शोध घेण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही. अंतर्यामी विष्णुमूर्ती म्हणजे, मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे. या विष्णुमुर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही तो विनाकारण नकली योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे. आणि त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्ययच आहे. श्रीकृष्ण हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहेत आणि मनुष्यांच्या हृदयात स्थित असलेली विष्णुमूर्ती ही योगाभ्यासाचे उद्दिष्ट आहे. या हृदयस्थित विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याने कामजीवनाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठीच त्याने गृहत्याग केला पाहिजे व एकांतस्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे. घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथुन करून आणि तथाकथित योग-वर्गास उपस्थित राहून कोणही योगी होऊ शकत नाही. मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती टाळण्याचा, ज्यामध्ये मैथुन जीवन प्रमुख आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे. महान ऋषी याज्ञवल्क्य यांनी ब्रह्मचार्याच्या नियमांबाबतीत सांगितले आहे की:
कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा।
सर्वत्र मैथुनत्यागौ ब्रह्मचर्यं प्रचक्षते ॥
‘‘सर्व काळी, सर्व परिस्थितींत व सर्व ठिकाणी कर्म, मन आणि वाचेमधून मैथुनत्याग करण्यास साहाय्य व्हावे हाच ब्रह्मचर्यव्रताचा उद्देश आहे.’’ मैथुन भोग करून कोणीही योगाभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही. म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच, जेव्हा मनुष्याला मैथुन जीवनाचे ज्ञान नसते, तेव्हापासूनच देण्यात येते. पाच वर्षे वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा अध्यात्मिक गुरुच्या आश्रमात पाठविले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिसत लावतात. अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करून शकत नाही मग तो ध्यान, ज्ञान किंवा भक्तियोग असो. तथापि, जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून (तेही नियमबद्ध) गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो, त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते. अशा संयमित गृहस्थांचा भक्तिपंथामध्ये स्वीकार करता येतो, परंतु ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला प्रवेशही दिला जात नाही. त्यांना कोणत्याही तडजोडशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्यव्रत अनिवार्य असते. भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला संयमित मैथुन भोग करण्याची अनुमती असते. कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की, दिव्य भगवत्सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआच मैथुन भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो. भगवद्गीतेमध्ये (2.59) सांगण्यात आले आहे की:
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन:।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते॥
‘‘इतरांना स्वत:हून इंद्रियतृप्तसाठी विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते, परंतु भगवद्भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रियतृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो. भक्ताव्यतिरिक्त इतर कोणलाही या उच्च रसाचे ज्ञान नसते.’’
विगत-भी:- जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित होत नाही तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही. विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजेच, श्रीकृष्णांशी असणार्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होय. श्रीमद्भागवत (11.2.37) सांगते की, भयं द्वितीयाभिनिवेशत: स्याद ईशादपेतस्य विपर्ययोऽस्मृति: निर्भय होण्यासाठी कृष्णभावना हाच एकमात्र आधार आहे. म्हणून, परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्णभावनाभावित मनुष्यालाच शक्य आहे आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पाहावायाचे असल्याकरणाने, कृष्णभावनाभावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. याठिकाणी सांगण्यात आलेली योगपद्धतीची तत्त्वे ही तथाकथित लोकप्रिय योगसंस्थांनी सांगितलेल्या तत्वांहून भिन्न आहेत.