No edit permissions for मराठी

TEXT 34

cañcalaṁ hi manaḥ kṛṣṇa
pramāthi balavad dṛḍham
tasyāhaṁ nigrahaṁ manye
vāyor iva su-duṣkaram

चञ्चलम्-चंचल; हि-निश्चितच; मनः-मन; कृष्ण-हे कृष्ण; प्रमाथि-विचलित करणारे; बल-वत्-बलवान; दृढम्-दुराग्रही; तस्य-त्याचे; अहम्-मी; निग्रहम्-निग्रह करणे; मन्ये-मला वाटते; वायो:-वायूच्या; इव-प्रमाणे; सु-दुष्करम्-कठीण किंवा दुष्कर.

हे कृष्ण! मन हे चंचल, उच्छंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते.

तात्पर्य: मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की, ते जरी बुद्धीच्या अधीन असले तरी ते कधीकधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजविते. व्यवहारी जगात अनेक विरोधी शक्तींचा सामना कराव्या  लागणा-या मनुष्याला मन संयमित करणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मनुष्याला मित्र आणि शत्रू दोघांबद्दलही कृत्रिमपणे समभाव असू शकेल, पण अंतिमतः कोणताही सांसारिक मनुष्य असे करू शकत नाही. कारण मनाला संयमित करणे हे वादळी वा-याला नियंत्रित करण्याहूनही कठीण आहे. वेदांमध्ये (कठोपनिषद् १.३.३-४) सांगितले आहे की,

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव च
बुद्धिं तु सारथिं विद्धि मन: प्रग्रहमेव च।

इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान्‌ ।
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिण:।।

          ‘‘भौतिक देहरूपी रथामध्ये जीव हा स्वार आहे आणि बुद्धी ही त्याची सारथी आहे. मन हे लगाम आहे आणि इंद्रिये घोडे आहेत. याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो, असे महान विचारवंत समजतात.'बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे; परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की, ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारितेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते. असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे; परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता. आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे? येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की, मनुष्याला वाहणा-या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्छुखल मनाला आवरणे होय. मनाला संयमित करण्याचा सहजसुलभ मार्ग म्हणजे, चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने 'हरेकृष्ण' महामंत्राचे कीर्तन करणे होय. याची विधी आहे स वै मनः कृष्ण पदारविन्दयो. मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे. केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणा-या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही.

« Previous Next »