No edit permissions for मराठी

TEXT 33

arjuna uvāca
yo ’yaṁ yogas tvayā proktaḥ
sāmyena madhusūdana
etasyāhaṁ na paśyāmi
cañcalatvāt sthitiṁ sthirām

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; यः अयम्—ही पद्धती; योगः-योग; त्वया-तुमच्याकडून; प्रोक्तः-वर्णित; साम्येन-सामान्यतः; मधु-सूदन-हे मधुसूदन; एतस्य-याची; अहम्-मी; —नाही, पश्यामि—पाहतो;चञ्चलत्वात्-चंचल असल्यामुले, स्थितिम्—स्थिती; स्थिराम- स्थिर

अर्जुन म्हणाला: हे मधुसूदन! तुम्ही सांगितलेली योगपद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.

तात्पर्य: शुची देशे पासून प्रारंभ होणा-या आणि योगी परमः या शब्दांमध्ये अंत होणा-या ज्या योगपद्धतीचे वर्णन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केले, त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला. कारण त्याला वाटले की, आपण या योगपद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत. या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून, वनामध्ये किंवा अरण्यामध्ये, एकांतवासात, योगाभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही. या युगाचे लक्षण आहे की, मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुषी जीवनासाठीसुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल. साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात्कार करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत, तर मग या कठीण योगपद्धतीबद्दल तर बोलायलाच नको. कारण या योगपद्धतीत, जीवनविधी, आसनस्थ होण्याची पद्धत, स्थानाची निवड आणि भौतिक कार्यांपासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात. व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योगपद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी, त्याला या योगपद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले. तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता, तो महान योद्धा होता, दीर्घायुषी होता आणि सर्वांत महत्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निकटस्थ सखा होता. पाच हजार वर्षापूर्वी, आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या; पण तरीही त्याने ही योगपद्धती नाकारली. वस्तुतः अर्जुनाने या योगपद्धतीचा अभ्यास केल्याचे आपल्याला इतिहासात कुठेही आढळत नाही. म्हणून वर्तमान कलियुगामध्ये या योगपद्धतीचे आचरण सामान्यतः अशक्यप्रायः समजले पाहिजे. अर्थात, काही अत्यंत थोड्या दुर्मिळ मनुष्यांना ही योगपद्धती शक्य असू शकेल; परंतु सर्वसामान्य लोकांना ही एक अशक्य गोष्ट आहे. जर पाच हजार वर्षांपूर्वी ही स्थिती होती तर सद्यस्थितीबद्दल काय बोलावे? जे या योगपद्धतीचे विविध योगसंस्थांमध्ये आणि योगवर्गामध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ कालापव्यय करीत आहेत. त्यांना अभिष्टध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे.

« Previous Next »