No edit permissions for मराठी

TEXT 35

śrī-bhagavān uvāca
asaṁśayaṁ mahā-bāho
mano durnigrahaṁ calam
abhyāsena tu kaunteya
vairāgyeṇa ca gṛhyate

श्री-भगवान् उवाच-श्री भगवान म्हणाले; असंशयम्-निःसंशय; महा-बाहो-हे महाबाहो; मनः—मन; दुर्निग्रहम्—निग्रह करण्यास कठीण; चलम्—चंचल; अभ्यासेन—अभ्यासाने; तु- परंतु; कौन्तेय-हे कुंतिपुत्रा; वैराग्येण-वैराग्याने; -सुद्धा; गृह्यते-संयमित करता येते.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले: हे महाबाहू कौंतेया ! चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे; पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे.

तात्पर्य: अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हेकेखोर मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले, पण त्याच वेळी भगवंत सुचवितात की, अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे. हा अभ्यास म्हणजे काय? सद्यस्थितीत, पवित्र स्थळी निवास करणे, परमात्म्यावर मन केंद्रित करणे, मन आणि इंद्रिये संयमित करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, कृष्णभावनेमध्ये, मनुष्य नवविधा भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो. या नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्णलीलांचे श्रवण होय. मनाला सर्व कल्मषांपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे. मनुष्य, कृष्णलीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्रीकृष्णांपासून दूर नेणा-या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो. ज्या कार्यांमुळे भगवद्भक्ती होत नाही, अशा कार्यांपासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते. वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त करणे होय. निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ती ही, कृष्णसेवेमध्ये मन आसक्त करण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे. कृष्णसेवेमध्ये मन आसक्त असते ही गोष्ट व्यवहार्य आहे, कारण कृष्णलीलांचे श्रवण केल्यामुळे मनुष्य आपोआपच परमात्म्यावर आसक्त होतो. या आसक्तीला परेशानुभूती किंवा आध्यात्मिक तृप्ती असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे भुकेल्या मनुष्याला अन्नाचा प्रत्येक घास खाल्यावर समाधान प्राप्त होत असते, भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते, त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते, कारण त्याचे मन भौतिक विषयांपासून अनासक्त होते. हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यामुळे होणा-या रोगनिवारणाप्रमाणे आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करणे हा उन्मत मनासाठी केलेला कुशल उपचार आहे आणि कृष्णप्रसाद ग्रहण करणे हा रोग्यासाठी योग्य असे पथ्य आहे. हा उपचार म्हणजेच कृष्णभावनेची पद्धती आहे.

« Previous Next »