No edit permissions for मराठी

TEXT 37

arjuna uvāca
ayatiḥ śraddhayopeto
yogāc calita-mānasaḥ
aprāpya yoga-saṁsiddhiṁ
kāṁ gatiṁ kṛṣṇa gacchati

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; अयतिः-असफल योगी; श्रद्धया-श्रद्धेने; उपेतः-युक्त झालेला; योगात्-योगापासून;चलित-पथभ्रष्ट; मानसः-ज्याचे मन असे आहे; अप्राप्य-प्राप्त न झाल्याने; योगसंसिद्धिम्-सर्वश्रेष्ठ योगसिद्धी; काम्—कोणती, गतिम्-लक्ष्य किंवा गतीला; कृष्ण-हे कृष्ण; गच्छति-प्राप्त करतो.

अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो; परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते?

तात्पर्य: योगाच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्येच तो सुखी होऊ शकतो. हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूळ तत्व आहे. सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहोंपलीकडे आहे. आत्मसाक्षात्काराची प्राप्ती ही, ज्ञानमार्ग, अष्टांगयोगाचा अभ्यास किंवा भक्तियोगाद्वारे होते. या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला, जीवाचे वैधानिक स्वरूप, त्याचा भगवंतांशी असणारा संबंध आणि ज्या क्रियांद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध पुनस्थापित होऊ शकेल आणि कृष्णभावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल, अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे. उपयुक्त तीनपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परम लक्ष्याची प्राप्ती होते. भगवंतांनी दुस-या अध्यायात सांगितले आहे की, या दिव्य मार्गावर अल्पशी प्रगती केल्यानेही मनुष्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. तीन मार्गापैकी भक्तियोग हा विशेषकरून या युगासाठी योग्य आहे कारण भगवत्साक्षात्काराचा हा अत्यंत सहजसुलभ मार्ग आहे. यासंबंधी पक्की खात्री करून घेण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या पूर्वीच्या विधानाला पुष्टी देण्याची विनंती केली. आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करील; परंतु या युगासाठी ज्ञानमार्ग आणि अष्टांगयोग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत. म्हणून निरंतर प्रयत्न करूनही, अनेक कारणांस्तव, मनुष्य अपयशी ठरू शकेल. सर्वप्रथम, मार्गाचा अवलंब करण्याइतपत मनुष्य प्रामाणिक नसेल. दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणे होय. यास्तव जेव्हा मनुष्य मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मायाशक्ती ही विविध प्रलोभनांद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते. भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना करतेवेळी सुद्धा, जीव पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते. यालाच योगाच्चलितमानस अर्थात, दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे.

« Previous Next »