No edit permissions for मराठी

TEXT 14

daivī hy eṣā guṇa-mayī
mama māyā duratyayā
mām eva ye prapadyante
māyām etāṁ taranti te

दैवी-दिव्य; हि-खचितच; एषा-ही; गुण-मयी-त्रिविध गुणांनी युत; मम-माझी; माया -शक्ती; दुरत्यया-दुस्तर; माम्-मला; एव-खचितच; ये-जे; प्रपद्यन्ते-शरण येतात; मायाम् एताम्-ही मायाशक्ती; तरन्ति-तरून जातात; ते-ते.

तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे; परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात.

तात्पर्य: भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत. जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते. याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत. जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत परा प्रकृती आहे; परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोहही शाश्वत असतो. म्हणून बद्ध जीवाला नित्य बद्ध असे म्हटले जाते. भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही. म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे, कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाहीत. कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे, कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्यही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते. अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्याकारणाने, सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य ती अत्यंत आश्चर्यकारकरीत्या करते. वेदांमध्ये याला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. मायांतु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् 'माया जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत.' (श्वेताश्वतरोपनिषद् ४.१०)

          गुण शब्दाचा आणखी एक अर्थ दोर असा होतो. यावरून जाणले पाहिजे की, बद्ध जीव हा मायारूपी दोरखंडांनी जखडून बांधला गेला आहे. हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वत:हून स्वतःला मोकळा करू शकत नाही, त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे साहाय्य घेणे जरुरीचे असते. एक बद्ध जीव दुस-या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे, सुटका करणारा मनुष्य  मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरूच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात. अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. भगवद्भक्ती किंवा कृष्णभावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो. श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती असल्यामुळे, बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात. शरणागत जीवावरील अहैतुकी कृपेमुळे आणि मूलतः भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात. म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठूर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरणकमलांना शरण जाणे होय. माम् एव हे शब्दही महत्वपूर्ण आहेत.

          माम् म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्णच (श्रीविष्णू) होत. ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्राय: श्रीविष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार, बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाहीत. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत. केवळ श्रीविष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात. वेद (श्वेताश्वतरोपनिषद् ३.८) तमेव विदित्वा 'अर्थात, केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे.' या वेदवचनात या गोष्टीची पुष्टी होऊ शकते. शंकर म्हणतात की, मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः'सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्रीविष्णूच आहेत यात मुळीच संशय नाही.'

« Previous Next »