No edit permissions for मराठी

अध्याय सातवा

(ज्ञानविज्ञानयोग)

TEXT 1: श्रीभगवान म्हणाले: हे पार्थ! माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे, निःसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक.

TEXT 2: प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही.

TEXT 3: सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणा-या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो.

TEXT 4: पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत.

TEXT 5: हे महाबाहू अर्जुना! याव्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ, भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात.

TEXT 6: सर्व सृष्ट प्राणिमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पतिकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण.

TEXT 7: हे धनंजया! माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्त्व नाही. दो-यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे.

TEXT 8: हे कौंतेया! पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ॐकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे.

TEXT 9: पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे, आणि अग्नीमधील उष्णता मी आहे, सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे.

TEXT 10: हे पार्था! अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्वशक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण.

TEXT 11: मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुन! धर्मतत्त्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे.

TEXT 12: सात्विक, राजसिक किंवा तामसिक, हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत.

TEXT 13: त्रिगुणांनी (सात्विक, राजसिक आणि तामसिक) मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत, त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही.

TEXT 14: तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे; परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात.

TEXT 15: जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत.

TEXT 16: हे भरतश्रेष्ठ अर्जुना! चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात-आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी.

TEXT 17: यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवद्भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे.

TEXT 18: निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत; परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे, त्याला मी माझ्या स्वत:प्रमाणेच मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी, सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची, प्राप्ती करतो.

TEXT 19: अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो, मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परमकारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो.

TEXT 20: ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात.

TEXT 21: मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्टदेवतेवर मी त्याची श्रद्धा दूढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो.

TEXT 22: अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो.

TEXT 23: अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात.

TEXT 24: मला पूर्णपणे न जाणणा-या अल्पबुद्धी लोकांना वाटते की, मी (पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण) पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत.

TEXT 25: मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत.

TEXT 26: हे अर्जुन! मी, पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानकाळात घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो; परंतु मला कोणीही जाणीत नाही.

TEXT 27: हे परंतपः भारता! इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणा-या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे, सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात.

TEXT 28: ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात.

TEXT 29: जरा-मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे.

TEXT 30: पूर्णपणे मत्परायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात.

« Previous Next »