No edit permissions for मराठी

TEXT 17

sahasra-yuga-paryantam
ahar yad brahmaṇo viduḥ
rātriṁ yuga-sahasrāntāṁ
te ’ho-rātra-vido janāḥ

सहस्त्र-एक सहस्र; युग-युगे; पर्यन्तम्-सहित; अहः-दिवस; यत्-जे; ब्रह्मणः ब्रह्मदेवाचा; विदुः-जाणतात; रात्रिम्-रात्री; युग-युगे; सहस्र-अन्ताम्-याचप्रमाणे, एक हजार युगे संपल्यानंतर; ते-ते; अह:-रात्र-दिवस आणि रात्र; विद:-जाणणारे; जनाः-लोक.

मानवीय गणनेनुसार, एक सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक हजार चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते.

तात्पर्य: प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पांच्या चक्रात तो गणला जातो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक हजार चतुर्युग होय. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते. सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्ययुगाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी हा १,७२८,००० वर्षे इतका असतो. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी १,२९६,००० वर्षे इतका असतो. द्वापार युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात -हास होतो आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. द्वापार युग८६४,००० वर्षांपर्यंत चालते. आणि शेवटी कलियुगामध्ये (५००० वर्षांपासून आपण या युगाचा अनुभव घेत आहोत) कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे -हास होतो. कलियुगाचा कालावधी ४३२,००० वर्षे इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की, शेवटी भगवंत स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा हा क्रम पुन्हा सुरूच राहतो. या चार युगांचे एक हजार वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्या फे-यांनंतर एक रात्र होते. अशी शंभर वर्षे इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार अशी शंभर वर्षे म्हणजे पृथ्वीवरील ३१,१०,००,०४,००,००,००० इतक्या वर्षांबरोबर होतात. या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते; परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगुर आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कारणोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्याकारणाने, त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते.

          प्राकृत विश्वात ब्रह्मदेवसुद्धा जन्म, मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत. परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडांचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्षप्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा सर्व लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात.

« Previous Next »