No edit permissions for मराठी

TEXT 3

śrī-bhagavān uvāca
akṣaraṁ brahma paramaṁ
svabhāvo ’dhyātmam ucyate
bhūta-bhāvodbhava-karo
visargaḥ karma-saṁjñitaḥ

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; अक्षरम्-अक्षर किंवा अविनाशी; ब्रह्म-ब्रह्म; परमम्-दिव्य; स्वभावः-शाश्वत स्वभाव; अध्यात्मम्-अध्यात्म; उच्यते-म्हटले जाते; भूतभाव-उद्रव-कर:-जीवांच्या भौतिक देहाची उत्पत्ती करणारे; विसर्गः-सृष्टी; कर्म-सकाम कर्म; संज्ञित:-म्हटले जाते.

श्रीभगवान म्हणाले: अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणा-या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात.

तात्पर्य: ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपावस्थेहून भिन्न असते. भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो; तथापि, आध्यात्मिक किंवा कृष्णभावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो. जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात, यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात.

          वेदांमध्ये जीवाला आणि ब्रह्म असे म्हणण्यात आले आहे, परंतु त्याला परब्रह्म कधीच म्हटलेले नाही. जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो, कधी कधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जडतत्वांशी अर्थात, अपरा प्रकृतीशी स्वत:चे तादात्म्य करतो तर कधी कधी श्रेष्ठ, पराप्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती असे म्हटले जाते. त्याने स्वत:च्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो. भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशू, पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. भौतिक स्वर्गीय लोकांची प्राप्ती करून तेथील सुखोपभोग घेण्यासाठी तो कधीकधी यज्ञ करतो; परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते, तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानवरूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते.

          छांदोग्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन करण्यात आले आहे. यज्ञकुंडामध्ये पाच प्रकारच्या अग्नीमध्ये पाच प्रकारच्या आहुती दिल्या जातात. हे पाच अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष आणि पाच प्रकारच्या यज्ञाहुती म्हणजे श्रद्धा, चंद्रावरील भोक्ता, वर्षा, अन्न आणि वीर्य होय.

          यज्ञपद्धतीमध्ये, जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकांच्या प्राप्तीकरिता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो. मग तो धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो व त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते, त्या वीर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये-जा सुरू असते; परंतु कृष्णभावनाभावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो. तो प्रत्यक्ष कृष्णभावनेचा स्वीकार करतो आणि त्यायोगे भगवद्धामात परत जाण्याची तयारी करतो.

          भगवद्गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार गैरवाजवी रीतीने गृहीत धरून चालतात की, भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी ते गीतेमधील पंधराव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकाचा आधार घेतात; परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की, 'जीव हा माझा नित्य अंश आहे.' भगवंतांचा अंश असणा-या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते. तथापि, भगवंतांचे (अच्युत) कधीही पतन होत नाही, म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही. वेदांमध्ये ब्रह्म (जीवात्मा) आणि परब्रह्म (भगवंत) यांच्यामध्ये भेद मानण्यात आला आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे.

« Previous Next »