TEXT 1
śrī-bhagavān uvāca
idaṁ tu te guhya-tamaṁ
pravakṣyāmy anasūyave
jñānaṁ vijñāna-sahitaṁ
yaj jñātvā mokṣyase ’śubhāt
श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; इदम्-हे; तु-परंतुः ते-तुला; गुह्य-तमम्-गुह्यतम् किंवा परमगोपनीय; प्रवक्ष्यामि-मी सांगतो, अनसूयवे-द्वेष न करणा-या, निर्मत्सरी, ज्ञानम्-ज्ञान, विज्ञान-साक्षात्कार किंवा अनुभूत ज्ञान; सहितम्-सहित, यत्-जे; ज्ञात्वा-जाणल्याने, मोक्ष्यसे-तू मुक्त होशील; अशुभात्-भौतिक अस्तित्वातील दुःखांपासून.
श्रीभगवान म्हणाले: हे अर्जुना! तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने, मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील.
तात्पर्य: भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो. या श्रवण विधीचा महिमा श्रीमद्भागवतात सांगण्यात आला आहे. 'भगवंतांचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत्कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो.' हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे, शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संगाने ते प्राप्त होऊ शकत नाही.
भक्त हे नित्य भगवत्सेवापरायण असतात. कृष्णभावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संगामध्ये कृष्ण-विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात. श्रीकृष्णविषयक चर्चेत अलौकिक सामथ्र्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो. अर्जुनाने आपल्या सामथ्र्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी, त्याला प्रेरणा देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या नवव्या अध्यायात करीत आहेत.
भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपोद्घात आहे आणि दुस-या आणि तिस-या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला 'गुह्य ज्ञान' म्हटले आहे. सातव्या आणि आठव्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेषकरून भक्तीशी संबंधित आहेत. हे विषय मनुष्याला कृष्णभावनेमध्ये प्रबुद्ध बनवितात. म्हणून त्यांना गुह्यातर ज्ञान म्हटले आहे; परंतु नवव्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे. म्हणून या ज्ञानाला परमगोपनीय ज्ञान असे म्हटले आहे. ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणेच दिव्यत्वामध्ये स्थित होतो आणि म्हणून, तो जरी भौतिक जगतात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही. भक्तिरसामृतसिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रेममयी भगवत्सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे, तो जरी प्राकृत बद्धावस्थेमध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की, अशा प्रकारे जो भगवत्सेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे.
पहिल्या श्लोकाला विशेष महत्त्व आहे. इदं ज्ञानम् (हे ज्ञान) या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो. ही भक्ती नऊ प्रकारची असते-श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य,साख्य आणि आत्मनिवेदन. भक्तीच्या या नऊ तत्वांचा अभ्यास केल्याने मनुष्याची आध्यात्मिक भावनेप्रत, कृष्णभावनेप्रत उन्नती होते. याप्रमाणे भौतिक विकारांपासून हृदय शुद्ध झाल्यावर तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकतो. जीव हा प्राकृत नाही, केवळ हे जाणणे पुरेसे नसते. आध्यात्मिक अनुभूतीचा तो प्रारंभ असू शकेल; परंतु मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्मयातील भेद जाणला पाहिजे.
यापूर्वीच सातव्या अध्यायामध्ये आपण भगवंतांची ऐश्वर्यशक्ती, त्यांच्या विविध शक्ती, परा आणि अपरा प्रकृती तसेच त्यांची ही सारी भौतिक अभिव्यक्ती याबद्दल चर्चा केली आहे. आता नवव्या अध्यायात भगवंतांच्या महत्तेचे वर्णन करण्यात येईल.
या श्लोकातील अनसुयवे हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण आहे. सामान्यतः भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांचा मत्सर करतात. मोठमोठ्या अतिशय निष्णात विद्वानांनी सुद्धा भगवद्गीतेवर चुकीचे भाष्य केले आहे. ते श्रीकृष्णांचा मत्सर करीत होत. असल्यामुळे त्यांची भाष्ये निरुपयोगी आहेत. भगवद्भक्तांनी केलेली भाष्ये हीच प्रामाणिक भाष्ये जर कोणी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषणही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञानही इतरांना प्रदान करू शकत नाही. श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चरित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूख आहे. म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे. श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल.