TEXT 10
mayādhyakṣeṇa prakṛtiḥ
sūyate sa-carācaram
hetunānena kaunteya
jagad viparivartate
मया-माझ्या; अध्यक्षेण-अध्यक्षतेखाली; प्रकृति:-भौतिक प्रकृती; सूयते-व्यक्त करते; स-दोन्ही; चर-अचरम्-चर आणि अचर; हेतुना-कारणांमुळे; अनेन-या; कौन्तेय-हे कोंतेया; जगत्-जगत; विपरिवर्तते-कार्य करीत आहे.
हे कोंतेया! माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो.
तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परमसंचालक आहेत. या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत. सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते. भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की, विविध योनींतील सर्व जीवांचा मी पिता आहे. पुत्रप्राप्तीकरिता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. हे जीव आपल्या पूर्वइच्छा आणि पूर्वकर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात. भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्वकर्मानुसार ते विविध शरीरे धारण करतात. म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात. केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते. भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने, नि:संशय हे त्यांचेच कार्य आहे; परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते. 'स्मृती'मध्ये पुढील उदाहरण दिले जाते; जेव्हा कोणापुढे सुगंधी फूल असते तेव्हा तो घ्राणेंद्रियाद्वारे सुगंध घेतो, पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फूल हे एकमेकांपासून दूर आहेत. याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो. वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते, पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात. सारांश, भगवंतांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही. तरीही भगवंत सर्व भौतिक कार्यांपासून अलिप्त असतात.