No edit permissions for मराठी

TEXT 15

jñāna-yajñena cāpy anye
yajanto mām upāsate
ekatvena pṛthaktvena
bahudhā viśvato-mukham

ज्ञान-यज्ञेन-ज्ञानरूप यज्ञाने किंवा ज्ञानाच्या जोपासनेने, -सुद्धा; अपि-निश्चितच; अन्ये-इतर; यजन्तः-यज्ञ करून; माम्-माझी; उपासते-उपासना करतात; एकत्वेन-एकत्वामध्ये; पृथक्वेन-द्वैतभावाने; बहुधा-विविधतेमध्ये; विश्वत:-मुखम्-आणि विराट रूपामध्ये.

इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात.

तात्पर्य: हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की, जे विशुद्ध कृष्णभावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते; तरीपण इतरही असे लोक आहेत जे यथार्थरूपामध्ये महात्मा नाहीत. तथापि, ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णांची उपासना करतात. त्यांच्यापैकी काहीजणांचे वर्णन यापूर्वीच आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले आहे. याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते. (१)स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात, (२) भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात आणि (३) जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्याची उपासना करतात. यांपैकी सर्वांत कनिष्ठ, जे स्वत:ची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत. असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वत:चीच पूजा करतात. हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे, कारण ते जाणू शकतात की, आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत, निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते. सामान्यतः निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात. दुस-या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश असतो. असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात. जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्या लोकांचा तिस-या श्रेणीमध्ये समावेश होतो. ते सृष्टीलाच परतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात. सृष्टीसुद्धा भगवंतांचे एक रूप आहे.

« Previous Next »