No edit permissions for मराठी

TEXT 14

satataṁ kīrtayanto māṁ
yatantaś ca dṛḍha-vratāḥ
namasyantaś ca māṁ bhaktyā
nitya-yuktā upāsate

सततम्-सतत, निरंतर; कीर्तयन्तः-कीर्तन करीत; माम्-माझे; यतन्तः-पूर्णपणे प्रयत्न करीत; -सुद्धा; दृढ-व्रताः-दृढ निश्चयाने; नमस्यन्तः-वंदन करीत; -आणि; माम्-मला; भक्त्या-भक्तिभावाने; नित्य-युक्ताः-नित्य युक्त झालेले असताना; उपासते-आराधना करतात.

हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत, दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात.

तात्पर्य: कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही. त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो. त्याला इतर कोणताही उद्योग नसतो. तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, तो निर्विशेषवादी नसतो. गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर, मनुष्याने पवित्र भगवन्नामाची, भगवंतांच्या शाश्वत रूपाची, त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे. त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे. म्हणून महात्मा हा भगवंतांवर अत्यंत आसक्त असतो.

          जो ब्रह्मज्योतीवर, भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही. पुढील श्लोकामध्ये त्याचे निराळ्या पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे. श्रीमद्भागवतात वर्णिल्याप्रमाणे विष्णूंचे श्रवण, कीर्तन, या विविध भक्तिक्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो. तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण, कीर्तन इत्यादी करीत नाही. श्रवणं कीर्तनं विष्णो:- आणि स्मरणम् म्हणजेच भक्ती होय. अशा महात्म्याने अंतिम लक्ष्य, पाच दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो. हे अंतिम लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो. यालाच परिपूर्ण कृष्णभावना असे म्हणतात.

          भक्तीमध्ये काही ठरावीक क्रिया करावयाच्या असतात, उदाहरणार्थ, एकादशी, भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हटले जाते. दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सान्निध्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींमध्ये महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत. महात्मेजन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलांची प्राप्ती खचितच होते.

          या अध्यायाच्या दुस-या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्तियोगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे. मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही. निष्णात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत, गृहस्थ, संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो.

« Previous Next »