No edit permissions for मराठी

TEXT 18

gatir bhartā prabhuḥ sākṣī
nivāsaḥ śaraṇaṁ suhṛt
prabhavaḥ pralayaḥ sthānaṁ
nidhānaṁ bījam avyayam

गतिः-ध्येय किंवा लक्ष्य; भर्ता-पालनकर्ता; प्रभुः-प्रभूः साक्षी-साक्षी; निवासः-निवास; शरणम्—शरण; सु-हृत्-अत्यंत जिवलग मित्र; प्रभवः-उत्पत्ती; प्रलयः—प्रलयः स्थानम्-आधार; निधानम्-विश्रांती स्थान, बीजम्-बीज, अव्ययम्--अविनाशी.

मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे.

तात्पर्य: गति म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे ते स्थान होय. सामान्य लोकांना माहीत नसले तरी परमलक्ष्य म्हणजे श्रीकृष्णच आहेत. ज्याला श्रीकृष्णांचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगती ही आंशिक अथवा भ्रामक असते. असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष्य मानतात आणि कठोर कर्मकांडांचे पालन करून निरनिराळ्या लोकांची उदाहरणार्थ, चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक महलौंक इत्यादींची प्राप्ती करतात. असे हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णांचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीतही. असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तींची अभिव्यक्ती असल्याकारणाने श्रीकृष्णच आहेत, परंतु श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते साहाय्यकारक ठरू शकतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही. उदाहरणार्थ, इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहक उपलब्ध असेल तर मनुष्याने जिन्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे? सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे. म्हणून श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत, कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. आपण निवास करीत असलेले स्थान, देश, ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकटनिवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की, आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते. श्रीकृष्ण हे तर परम आत्मा आहेत. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांतिस्थान आहेत. यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत.

« Previous Next »