No edit permissions for मराठी

TEXT 19

tapāmy aham ahaṁ varṣaṁ
nigṛhṇāmy utsṛjāmi ca
amṛtaṁ caiva mṛtyuś ca
sad asac cāham arjuna

तपामि-उष्णता देतो; अहम्-मी; अहम्-मी; वर्षम्-वर्षा किंवा पाऊस; निगृह्यामि-रोखून ठेवतो; उत्सृजामि-पाठवितो; -आणि; अमृतम्-अमृततत्त्व; -आणि; एव-निश्चितच; मृत्युः-मृत्यू; -आणि; सत्-सत किंवा चेतन; असत्-किंवा पदार्थ; -आणि; अहम्-मी; अर्जुन-हे अर्जुन.

हे अर्जुना! मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही, मी  अमृततत्त्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत्(चेतन) आणि असत्(जड पदार्थ) दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत.

तात्पर्य: श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तींनी करतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येईल की, श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही किंवा दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, सत् आणि असत् किंवा जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्णभावनेच्या उन्नतावस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करीत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांना पाहतो.

श्रीकृष्ण हे सत् आणि असत् दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि द्विभुज श्यामसुंदर रूपातील वेणुवादन करणा-या त्यांच्या वृंदावनलीला या भगवान रूपातील लीला आहेत.

« Previous Next »