TEXT 24
ahaṁ hi sarva-yajñānāṁ
bhoktā ca prabhur eva ca
na tu mām abhijānanti
tattvenātaś cyavanti te
अहम्-मी; हि-निश्चितच; सर्व-सर्व; यज्ञानाम्-यज्ञांचा; भोक्ता-भोक्ता; च-आणि; प्रभुः-प्रभू किंवा स्वामी; एव-सुद्धा; च-आणि; न-नाही; तु-परंतु माम्-मला; अभिजानन्ति-ते जाणतात; तत्त्वेन-तत्त्वतः; अतः-म्हणून; च्यवन्ति-पतन पावतात; ते—ते.
सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्त्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते.
तात्पर्य: या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की, वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत; परंतु ते सर्व यज्ञ भगवंतांच्या संतुष्टीप्रीत्यर्थ आहेत. यज्ञ म्हणजेच विष्णू होय. भगवद्गीतेच्या तिस-या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की, मनुष्याने केवळ यज्ञ किंवा श्रीविष्णुप्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. वर्णाश्रम धर्म हा विशेषकरून श्रीविष्णूंच्या संतुष्टिप्रीत्यर्थ योजिला आहे. म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की, 'मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे कारण मी प्रभू आहे.' ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिता देवतांची उपासना करतात. म्हणून त्यांचे संसारसागरात पतन होते आणि त्यांना जीवनाची अभीष्टसिद्धी प्राप्त होत नाही; तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावयाच्या असतील तर त्याने भगवंतांकडेच याचना करणे अधिक बरे. (जरी ही शुद्ध भक्ती नसली तरी) कारण अशा रीतीने त्याला इष्ट फलाची प्राप्ती होईल.