TEXT 32
māṁ hi pārtha vyapāśritya
ye ’pi syuḥ pāpa-yonayaḥ
striyo vaiśyās tathā śūdrās
te ’pi yānti parāṁ gatim
माम्-माझा; हि-निश्चितच; पार्थ-हे पार्थ; व्यपाश्रित्य-आश्रय घेऊन; ये-जे; अपि- सुद्धा; स्युः-आहेत; पाप-योनयः--हीन कुळामध्ये जन्मलेला; स्त्रियः-स्त्रिया; वैश्याः-वैश्य; तथा-सुद्धा; शूद्रा:-शूद्र; ते अपि-ते सुद्धा; यान्ति-जातात; पराम्-परम; गतिम्-गतीला किंवा लक्ष्यास.
हे पार्था! जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील, स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात.
तात्पर्य: या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की, भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो. भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते; परंतु जो दिव्य भगवद्भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो, त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो. परम गती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्रीमद्भागवतात (२.४.१८) सांगितले आहे की, चांडाळी शुदध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात. म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की, उच्च-नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहात नाही. कोणीही याचा स्वीकार करू शकतो. शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्यही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो. विविध प्राकृतिक गुणांनुसार मनुष्यांचे सत्वगुणी (ब्राह्मण), रजोगुणी (क्षत्रिय किंवा प्रशासक), रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले (वैश्य किंवा व्यापारी) आणि तमोगुणी (शूद्र) असे वर्गीकरण केलेले आहे. यांच्यापेक्षाही हीन कुळातल्या लोकांना चांडाळ असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो. सामान्यतः उच्चकुळातील लोक हीन कुळातील लोकांचा संग स्वीकारीत नाहीत; परंतु भगवद्भक्ती ही इतकी प्रबळ आहे की, भगवंतांचा शुद्ध भक्त सर्व हीनकुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते. या श्लोकातील 'व्यपश्रित्य'या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे. तरच तो महान ज्ञानी आणि महान योग्यांपेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो.