TEXT 34
man-manā bhava mad-bhakto
mad-yājī māṁ namaskuru
mām evaiṣyasi yuktvaivam
ātmānaṁ mat-parāyaṇaḥ
मत्-मनाः-सदैव माझे स्मरण चिंतन करणाराः भव-हो; मत्-माझाः भक्तः-भक्तः; मत्-माझी; याजी—पूजन करणारा; माम्—मला; नमस्–कुरु—नमस्कार कर, माम्—मला; एव— पूर्णपणे; एष्यसि-तू येशील; युक्त्वा-तलीन होऊन; एवम्-याप्रमाणे; आत्मानम्-आपल्या आत्म्याला; मत्-परायणः-मला समर्पित किंवा मत्परायण.
आपले मन, सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील.
तात्पर्य: या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे कृष्णभावना होय. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे; परंतु कधी कधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात. दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवितात. असे भाष्यकार जाणत नाहीत की, श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परम सत्य आहेत. त्यांचा देह, त्यांचे मन आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहेत. भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींनी चैतन्य चरितामृतावरील (पाचवा अध्याय आदी लीला ४१-४८) आपल्या अनुभाष्य या भाष्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कुर्मपुराणात म्हटले आहे की, देहदेहीविभेदोऽयं नेश्र्वरे विद्यते क्वचित्-अर्थात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा देह यामध्ये मुळीच भेद नाही. परंतु भाष्यकारांना हे कृष्ण-विज्ञान ज्ञात नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना लपवितात आणि त्यांच्या स्वरूपाचे, त्यांच्या देहापासून अथवा मनापासून विभाजन करतात. कृष्णविज्ञानासंबंधी हे जरी निव्वळ अज्ञान असले तरी, काही लोक जनतेला भ्रमित करून स्वत:चा स्वार्थ साधतात.
काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आणि ते सुद्धा श्रीकृष्णांचे चिंतन करतात, पण त्यांचे चिंतन हे श्रीकृष्णांना मामा, कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असते. कंसदेखील सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता, परंतु तो श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होता. केव्हा कृष्ण येईल आणि आपल्याला ठार मारील या विचाराने तो नेहमी चिंतातुर असे. अशा प्रकारे केलेले चिंतन आपल्याला साहाय्यकारक ठरू शकत नाही. मनुष्याने भगवान श्रीकृष्णाचे चिंतन भक्तिपूर्ण प्रेमभावाने केले पाहिजे, याला भक्ती असे म्हटले जाते. मनुष्याने निरंतर कृष्णविज्ञानाचे अनुशीलन करावे. असे अनुशीलन अनुकूल केव्हा होते? तर त्याकरिता प्रामाणिक आचार्याकडून हे कृष्णविज्ञान शिकले पाहिजे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत आणि आम्ही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, भगवंतांचा देह हा प्राकृत नसून सच्चिदानंदमयी आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णाचे चिंतन केल्याने मनुष्य भक्त होऊ शकतो. अन्यथा अयोग्य व्यक्तींपासून श्रीकृष्णांना जाणणे व्यर्थच ठरते.
म्हणून मनुष्याने शाश्वत आदिपुरुष श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये मनाला निमग्न ठेवून श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये स्वतःला संलग्न करावे. श्रीकृष्णांच्या पूजनासाठी भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांची भक्तिपूर्ण सेवा केली जाते. अशी भक्तिपूर्ण सेवा करताना मनुष्याने श्रीकृष्णांना वंदन केले पाहिजे. मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आपले तन, मन, आपली कमें सर्व काही युक्त केले पाहिजे. यामुळे तो दृढपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण होऊ शकेल आणि त्याला कृष्णलोकाची प्राप्ती होणे सुलभ होईल. तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये. श्रीकृष्णांच्या श्रवणकीर्तनादी नवविधा भक्तीमध्ये मनुष्याने निमग्न झाले पाहिजे. शुद्ध भक्ती ही मानवसमाजाची परम उपलब्धी आहे.
ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध भगवद्भक्तीचे निरूपण भगवद्गीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतर्यामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होतात, परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो.
श्रीकृष्णांवर एक सुंदर काव्यरचना करण्यात आली आहे. या कवितेमध्ये म्हटले आहे की, देवतांचे उपासक हे निर्बुद्ध असतात आणि त्यांना कृष्णप्राप्ती कधीही होत नाही. प्रारंभावस्थेमध्ये एखाद्या भक्ताचे कधी कधी मार्गावरून पतन होऊ शकते; परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्वज्ञानी किंवा योग्यापेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे. जो सदैव कृष्णभावनेमध्ये युक्त असतो त्याला परिपूर्ण साधू मानले पाहिजे. त्याने प्रसंगावश केलेली भक्तिविहीन कर्मे नष्ट होतील आणि लौकरच तो निःसंदेह परमसिद्धी प्राप्त करील. वास्तविक शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते कारण भगवंत स्वत: शुद्ध भक्ताची काळजी घेतात. म्हणून बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्णभावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगतामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे. अखेरीस त्याला कृष्णरूपी सर्वांत महान वस्तू प्राप्त होईल.
या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘राजविद्या राजगुह्ययोग’ या नवव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.