No edit permissions for मराठी

TEXT 4

mayā tatam idaṁ sarvaṁ
jagad avyakta-mūrtinā
mat-sthāni sarva-bhūtāni
na cāhaṁ teṣv avasthitaḥ

मया-माझ्याद्वारे; ततम्-व्यापलेले आहे; इदम्-हे; सर्वम्-सर्व; जगत्-जगत; अव्यक्तमूर्तिना-अव्यक्त रूपाने; मत्स्थानि-माझ्या ठायी; सर्व-भूतानि-सर्व जीव; -नाही; -सुद्धा; अहम्-मी; तेषु-त्यांच्यामध्ये; अवस्थितः-स्थित आहे.

मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही.

तात्पर्य: भगवंतांचा साक्षात्कार, स्थूल, भौतिक इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही. असे सांगितले आहे की:

अत: श्रीकृष्णनामादि न भवेद्‌ ग्राह्यमिन्द्रियै:।
सवोन्मुखे हि जिह्वादों स्वयमेव स्फुरत्यद:।।

(भक्तिरसामृतसिंधु १.२.२३४

          ‘'स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम, गुण, लीला इत्यादी जाणणे शक्य नाही. योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात.'’ (भक्तिरसामृतसिंधु १.२.१३४) ब्रह्मसंहितेत (५.३८) सांगण्यात आले आहे की, प्रेमाञ्जनच्छुरितभक्तिविलोचनेन सन्तः सदैव हृदयेषु विलोकयन्ति—जर मनुष्याने भगवान श्रीगोविंदांच्या ठायी प्रेमभाव विकसित केला तर तो श्रीगोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो. म्हणून सामान्यजनांना भगवंत दृश्य होत नाहीत. या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, भगवंत हे सर्वव्यापी असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियाद्वारे अनुभूती होऊ शकत नाही. येथे अव्यक्तमूर्तिना या शब्दावरून हे दर्शविण्यात आले आहे. तथापि, वस्तुत: आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. सातव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा, परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती, संयोग आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे, त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे. सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे.

          तरीही कोणी असा निष्कर्ष काढू नये की, भगवंत ज्याअर्थी सर्वव्यापी आहेत त्याअर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे. अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात, 'मी सर्वव्यापी आहे, सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे, तरीही मी अलिप्त आहे.' उदाहरणार्थ, राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे. प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो; परंतु राजा व्यक्तिशः प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही. हे एक स्थूल उदाहरण आहे. त्याचप्रमाणे आपण पाहात असलेले सारे सृष्ट पदार्थ, भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारे सर्व काही भगवंतांच्या शक्तीवर आश्रित आहे. भगवंतांच्या विविध शक्तींच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होते आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे विष्टभ्याहमिदं कृत्स्नम्-ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने म्हणजेच परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तींच्या विस्ताराने, सर्वत्र उपस्थित आहेत.

« Previous Next »