TEXT 8
prakṛtiṁ svām avaṣṭabhya
visṛjāmi punaḥ punaḥ
bhūta-grāmam imaṁ kṛtsnam
avaśaṁ prakṛter vaśāt
प्रकृतिम्-भौतिक प्रकृती; स्वाम्-माझ्या स्वतःच्या;अवष्टभ्य-मध्ये प्रवेश करून; विसृजामि मी निर्माण करतो; पुनः पुनः-पुनः पुन्हा; भूत-ग्रामम्-भौतिक सृष्टी; इमम्-या; कृत्स्नम्संपूर्ण; अवशम्-आपोआपच; प्रकृते:-प्राकृतिक शक्तीच्या; विशात्-वश झाल्यामुळे.
संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुनः पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो.
तात्पर्य: हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे. हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे. उत्पत्तीच्यावेळी भौतिक शक्ती महत्तत्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार, महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. ते कारणोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छवासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गभौदकशायी विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात. या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते. नंतर भगवंत स्वत:ला क्षीरोदकशायी विष्णूंच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये, सूक्ष्म अणूमध्येही, प्रवेश करतात. या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात.
आता जीवात्म्यांसंबंधी सांगावयाचे तर, या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच, जीवाच्या निरनिराळ्या योनींच्या कार्यास प्रारंभ होतो. असे नाही की, या सर्वांची उत्क्रांती होते. जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात. मनुष्य, पशू, पक्षी, सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते, कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात. अवशमया शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की, या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते. हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत.