TEXT 10
aparyāptaṁ tad asmākaṁ
balaṁ bhīṣmābhirakṣitam
paryāptaṁ tv idam eteṣāṁ
balaṁ bhīmābhirakṣitam
अपर्याप्तम्-अपरिमित; तत्-ते; अस्माकम्-आमचे; बलम्-शक्ती, बल; भीष्म-पितामह भीष्माद्वांरे; अभिरक्षितम्-पूर्णपणे सुरक्षित; पर्याप्तम्-सीमित, परिमित; तु-परंतु; इदम्-हे सर्व; एतेषाम्-पांडवांचे; बलम्-शक्ती, बल; भीम-भीमाने; अभिरक्षितम्-काळजीपूर्वक रक्षण केलेले.
आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत; परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे.
ताप्तर्य : या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वांत अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलटपक्षी, कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडवसैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे. कारण तो पूर्णपणे जाणून होता की, जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वत:च्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता.