TEXT 12
tasya sañjanayan harṣaṁ
kuru-vṛddhaḥ pitāmahaḥ
siṁha-nādaṁ vinadyoccaiḥ
śaṅkhaṁ dadhmau pratāpavān
तस्य - त्याचा; सञ्जनयन् - वाढवीत; हर्षम् - हर्ष, आनंद; कुरु-वृद्ध:- कुरुवंशातील वयोवृद्ध (भीष्म); पितामह:- पितामह; सिंह-नादम्-सिंहगर्जनेप्रमाणे; विनद्य-निनाद करीत; उच्चै:-उच्च स्वरात; शङ्खम्-शंख; दध्मौ- वाजविला; प्रताप-वान्-पराक्रमी.
नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने, सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला.
तात्पर्य: कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंत:करणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरुपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की, त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वत: परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते.