No edit permissions for मराठी

TEXT 28

arjuna uvāca
dṛṣṭvemaṁ sva-janaṁ kṛṣṇa
yuyutsuṁ samupasthitam
sīdanti mama gātrāṇi
mukhaṁ ca pariśuṣyati

अर्जुन:उवाच - अर्जुन म्हणाला; दृष्ट्वा-पाहून; इमम्-या सर्व; स्व-जनम्-नातेवाईक, सगेसोयरे; कृष्णा-हे कृष्ण; युयुत्सुम्-युद्धोत्सुक झालेल्या सर्वांना; समुपस्थितम्- उपस्थित; सीदन्ति-कंप सुटतो; मम-माझ्या; गात्राणि-शरीराच्या अवयवांना; मुखम्-मुख; -सुद्धा; परिशुष्यति-कोरडे पडत आहे.

अर्जुन म्हणाला: हे कृष्ण! या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे.

तात्पर्य: भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे, देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसांत युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगेसोयर्‍यांना आणि नातवाईकांना पाहिले, तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकूळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती. आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करूणा वाटली. याप्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुत: संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी याठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की, फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते; एवढेच नव्हे, तर तो करुणेने अश्रूसुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती, तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की,

     यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिंचना सवैगुणैस्तत्र समासते सुरा:।
     हरावभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहि:॥

     ‘‘ज्याला पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवद्भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षिला जातो.’’ (श्रीभद्भागवत 5.18.12)

« Previous Next »