No edit permissions for मराठी

TEXT 36

pāpam evāśrayed asmān
hatvaitān ātatāyinaḥ
tasmān nārhā vayaṁ hantuṁ
dhārtarāṣṭrān sa-bāndhavān
sva-janaṁ hi kathaṁ hatvā
sukhinaḥ syāma mādhava

पापम्-पाप; एव-खचित; आश्रयेत्-भागी होणार; अस्मान्-आम्हाला; हत्वा-वध करून; एतान्-या सर्वांना; आततायिन:- आततायी, आक्रमक; तस्मात्-म्हणून; -नाही; अर्हा:-योग्य; वयम्-आम्ही; हन्तुम्-मारण्याला; धार्तराष्ट्रान्-धृतराष्ट्रपुत्र; -बान्धवान्-मित्रांसहित; स्व-जनम्-नातलग; हि-खचित; कथम्- कसे; हत्वा-हत्या करून; सुखिन:- सुखी, आनंदी; स्याम-आम्ही होऊ; माधव-हे माधव (लक्ष्मीपती कृष्ण).

या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव! आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ?

तात्पर्य: वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आततायी असतात-(1) जो विष देतो, (2) जो घराला आग लावतो,(3) जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रानिशी हल्ला करतो, (4) जो संपत्ती लुटतो, (5) जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि (6) जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामन्य मनुष्याला शोभेल असेल आहे; पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावत:च तो साधुवृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधुवृत्तीला अनुसरुनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवत् असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की, आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत; पण असे असले, तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखविला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे, सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की, त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र, त्याच्याविरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वत:चे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की, सामान्य आततायीविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्याविरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधुव्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधुव्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्त्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की, राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधुवृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सरतेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वत:ची शाश्वत मुक्ती आणि स्वत:चे जीवन धोक्यात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना ‘माधव’ असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की, त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत.

« Previous Next »