No edit permissions for मराठी

TEXTS 4-5

buddhir jñānam asammohaḥ
kṣamā satyaṁ damaḥ śamaḥ
sukhaṁ duḥkhaṁ bhavo ’bhāvo
bhayaṁ cābhayam eva ca

ahiṁsā samatā tuṣṭis
tapo dānaṁ yaśo ’yaśaḥ
bhavanti bhāvā bhūtānāṁ
matta eva pṛthag-vidhāḥ

बुद्धिः-बुद्धी; ज्ञानम्-ज्ञान; असम्मोहः-संशयातून मुक्तता; क्षमा-क्षमा; सत्यम्-सत्य; दमः-इंद्रिय संयमन; शमः-मनाचा संयम: सुखम्-सुख; दुःखम्-दुःख; भवः-जन्म; अभावः-मृत्यू; भयम्-भय; -सुद्धा; अभयम्-निर्भयता; एव-सुद्धा; -आणि; अहिंसा-अहिंसा; समता-समता; तुष्टिः-तृप्ती; तपः-तपः दानम्-दान; यशः-यश; अयशः-अपयश; भवन्ति-होतातः भावाः-अवस्था, स्वभाव; भूतानाम्-जीवांचे; मत्तःमाझ्यापासून; एव-निश्चितच; पृथक्-विधा:-अनेक प्रकारचे.

बुद्धी, ज्ञान, संशय आणि मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रियसंयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख; जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत.

तात्पर्य: जीवांचे विविध गुणधर्म मग ते चांगले असोत अथवा वाईट, सर्व भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केले आहेत आणि त्यांचे वर्णन या शलोकामध्ये करण्यात आले आहे.

          बुद्धि म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्वतः जाणणे होय. विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही. ज्ञान म्हणजे चेतन आणि पदार्थ यामधील भेद जाणणे होय. आधुनिक शिक्षणामध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही. या शिक्षणामध्ये केवळ भौतिक तत्वे आणि शारीरिक गरजांकडे विशेष ध्यान दिले जाते. म्हणून हे शैक्षणिक ज्ञान परिपूर्ण नाही.

          असम्मोह, जेव्हा मनुष्य द्विधावस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो. हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो. कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केला पाहिजे. क्षमा आचरणात आणली पाहिजे; मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहानसहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे. सत्यम् म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे. तथ्यांचे विकृतीकरण करू नये. सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते की, इतरांच्या गळी उतरेल असेच सत्य मनुष्याने बोलावे, परंतु हे खरे नाही. सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे, जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल. जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे. कधी कधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये. सत्यता म्हणजेच तथ्यांचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे होय आणि ही सत्यतेची व्याख्या आहे.

          इंद्रियनिग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय. इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरविण्यास कोणताच निबंध नाही; परंतु अनावश्यक इंद्रियोपभोग हा आध्यात्मिक प्रगतीकरिता हानिकारक आहे. म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे. यालाच शम असे म्हटले जाते. तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दवडू नये, कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे. मनुष्यजीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे. विचारशक्ती ही शास्त्रपारंगत अधिकृत व्यक्ती, साधुसंत, आध्यात्मिक गुरू आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे. सुखमू कृष्णभावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे. त्याचप्रमाणे जे कृष्णभावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे. कृष्णभावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्णभावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा.

          भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे. आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्‌गीतेच्या प्रारंभीच केली आहे. जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत. भविष्यकाळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते. कृष्णभावनाभावित मनुष्याला मुळीच भय नसते, कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची, भगवद्धामाची प्राप्ती होणार असते. म्हणून त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो. तथापि, इतरांना भविष्यकाळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे माहीत नसते, त्यांना भावी जीवनासंबंधीही मुळीच ज्ञान नसते. म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात. जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हावयाचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्णभावनेमध्ये स्थित राहणे होय. अशा प्रकारे आपण सर्व भयांपासून मुक्त होतो. श्रीमद्भागवतात (११.२.३७) म्हटले आहे की, भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यातू-मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते. परंतु जे मायेतून मुक्त झाले आहेत, ज्यांना निश्चितपणे माहीत आहे की, आपण म्हणजे हे प्राकृत शरीर नसून भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत, त्यांना कशाचेही भय नसते. त्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते. जे लोक कृष्णभावनाभावित नाहीत ते भयभीतच असतात. अभयम् अर्थात, निर्भयता ही केवळ कृष्णभावनाभावित मनुष्याच्या ठायीच असू शकते.

          अहिंसा म्हणजे इतरांना दु:खात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय. अनेक राजकारणी, समाजवादी, परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासने दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही, कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानवसमाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नसते. अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे, जेणेकरून या मनुष्यदेहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील. मनुष्यदेह हा आध्यात्मिक साक्षात्कारप्राप्तीसाठी आहे. म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कारप्राप्तीसाठी साहाय्यक ठरत नाहीत ते मनुष्यदेहाची हिंसाच करीत आहेत. ज्यायोगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात.

          समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय. अत्यधिक आसक्ती किंवा अत्यधिक अनासक्ती ही बरी नसते. द्वेषरहित आणि अनासक्त होऊन या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे. कृष्णभावनेचे आचरण करण्यास जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे. यालाच समता असे म्हणतात. कृष्णभावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टीशी कृष्णभावनाभावित मनुष्याला कर्तव्य असते, नाही तर त्याला स्वीकार करणयासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते.

          तुष्टि म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये. भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावरच समाधान मानावे, यालाच तुष्टि असे म्हणतात. तपस याबाबतीत वेदांमध्ये अनेक विधिविधाने सांगितली आहेत. उदाहरणार्थ, प्रात:काळी उठून स्नान करणे. कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते; परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय. त्याचप्रमाणे महिन्यातून ठरावीक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत. मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल; परंतु कृष्णभावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरिता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे. तथापि, आवश्यकता नसताना किंवा वेदज्ञेविरुद्ध उपवास करू नये. व्यक्तीने राजकीय हेतूप्रीत्यर्थ उपवास करू नये. अशा उपवासाचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे. तमोगुण युक्त किंवा रजोगुणयुक्त जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही, परंतु सत्त्वगुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदांनुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते.

          दान याबद्दल सांगावयाचे तर, व्यक्तीने आपल्या मिळकतीतून पत्रास टके दान सत्कार्यासाठी द्यावे. सत्कार्य म्हणजे काय? कृष्णभावनेने जे कार्य केले जाते ते सत्कार्य होय. ते केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य होय. श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्याप्रीत्यर्थ केलेले कार्यही उत्तमच असते. म्हणून जो कृष्णभावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे. वेदांमध्ये सांगितले आहे की, ब्राह्मणांना दान द्यावे. आजतागायत, जरी वेदज्ञेनुसार काटेकोरपणे नसले तरी, या प्रथेचे पालन केले जाते. तरीही वेदांचा आदेश आहे की, ब्राह्मणांना दान करावे, का बरे? कारण ते उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्पित केले पाहिजे. ब्रह्म जानातीति ब्राह्मण:-जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात. म्हणून ब्राह्मणांना दान द्यावे, कारण ते सदैव आध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो. वेदांनुसार संन्यांशानाही दान दिले पाहिजे. संन्यासी धनार्जन करण्याकरिता नव्हे तर धर्मप्रचार करण्याकरिता घरोघर माधुकरी मागतात. गृहस्थी व्यक्तींना अज्ञानरूपी निद्रेतून जागृत करण्यासाठी संन्यासी दारोदारी जातात. गृहस्थाश्रमी लोक कौटुंबिक कार्यांत दंग असल्यामुळे त्यांना जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे, कृष्णभावनेची पुनर्जागुती करण्याचे, विस्मरण झालेले असते म्हणून त्यांना कृष्णभावनाभावित होण्यास प्रेरणा देण्याकरिता त्यांच्याकडे भिक्षू म्हणून जाणे हे संन्याशाचे कार्य आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्यदेहात जे प्राप्त करावयाचे असते ते त्याने प्राप्त करावे. या ज्ञानाचा व ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचा प्रसार संन्याशांद्वारे केला जातो, यास्तव संन्याशांना, ब्राह्मणांना व सत्कार्यार्थ दान द्यावे. कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये.

          यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की, मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो प्रख्यात होतो. हेच वास्तविक यश होय. जर कृष्णभावनेमध्ये महान होऊन मनुष्य विख्यात झाला तरच ते वास्तविक यश होय. ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपयशीच होय.

          हे सर्व गुण सा-या ब्रह्मांडातील मानवसमाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रकट होतात. इतर ग्रहलोकांवर मानवजातीची अनेक रूपे आहेत आणि त्यांच्यातही हे विविध गुण असतात. ज्या व्यक्तीला कृष्णभावनेमध्ये प्रगती करावयाची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात; परंतु व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंत:करणात स्वत:हून केला पाहिजे. जो भगवद्भक्तीमध्ये निमग्न होतो, त्याच्यामध्ये भगवंतांच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात.

          आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत. जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वत:हून या भौतिक जगतात प्रकट होऊच शकत नाही. यालाच ज्ञान म्हणतात. सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी, या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे.

« Previous Next »