No edit permissions for मराठी

TEXT 6

maharṣayaḥ sapta pūrve
catvāro manavas tathā
mad-bhāvā mānasā jātā
yeṣāṁ loka imāḥ prajāḥ

महा-ऋषयः-महर्षी; सप्त-सात; पूर्वे-पूर्वी; चत्वारः--चारः मनवः-मनूः तथा-सुद्धा; मत्-भावाः—माझ्यापासून उत्पन्न झालेले, मानसाः—मनापासून; जाताः—जन्म झालेले, येषाम्— ज्यांच्या; लोके-लोकामध्ये, जगामध्ये; इमाः-या सर्व; प्रजाः-प्रजा.

सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू (मानवजातीचे प्रजापती) माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात.

तात्पर्य: भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहेत. ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय. ब्रह्मदेवापासून सात महर्षी, त्यांच्यापूर्वी सनक, सनन्द, सनातन आणि सनतकुमार हे चार महर्षी आणि मनू प्रकट झाले. या पंचवीस महर्षीना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते. ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे. या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापतींपासून झाला आहे. ब्रह्मदेवांनी प्रथम देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले. ब्रह्मदेवांपासून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले. या प्रकारे भगवंतांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात तर श्रीकृष्णांना प्रपितामह असे म्हणतात. हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात (११.३९) सांगितले आहे.

« Previous Next »